फलटण : न्यू फलटण शुगर वर्क्सकडून मिळणाºया थकीत ऊसबिलासाठी संतप्त शेतकºयांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. संपूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय जागेवरून हलणार नसल्याचा आणि काहींनी आत्महत्येचा इशारा दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, कारखाना प्रशासनाशी फोनवरून तहसीलदारांनी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी संबंधितांना बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले. त्यामुळे शेतकरी शांत झाले आणि आंदोलन थांबले.फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स कारखान्याने मागील हंगामात गाळपास आलेल्या उसाचे पेमेंट न केल्याने ऊस पुरवठा करणारे शेतकरी अत्यंत अडचणीत आलेले आहेत. आत्तापर्यंत शेतकºयांनी विविध मार्गांनी आंदोलन करून कारखाना प्रशासनाकडे उसाचे पेमेंट त्वरित करण्याची मागणी केली. मात्र, कारखाना व्यवस्थापनाकडून या मागणीची पूर्तता न झाल्याने ऊस उत्पादक शेतकºयांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. साखरवाडी कारखाना अडचणीतून बाहेर यावा, ऊस उत्पादकांचे पेमेंट करता यावे, यासाठी कारखाना प्रशासनाकडूनही विविध मार्गाने प्रयत्न सुरू होते.
ऊस उत्पादक शेतकºयांनी यापूर्वी प्रांत आणि तहसील कार्यालयात अनेकवेळा निवेदने देऊन प्रत्यक्ष भेटून ऊसबिलाच्या रकमेची मागणी केली होती. यासंदर्भात प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी ऊसउत्पादक आणि कारखाना व्यवस्थापनाशी बैठका घेऊन अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. कारखाना प्रशासनाने अनेकवेळा पेमेंट करण्याच्या वेगवेगळ्या तारखा दिल्या. मात्र, पेमेंट न झाल्याने गुरुवारी संतप्त ऊसउत्पादक शेतकºयांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांसमवेत तहसीलदार कार्यालयात येऊन तहसीलदार विजय पाटील यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले.
आमच्या ऊसबिलाची संपूर्ण रक्कम मिळत नाही आणि आमची फसवणूक करणाºया कारखाना प्रशासनावर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत येथून हलणार नसल्याचा इशारा दिला. काही ऊसउत्पादकांनी आम्ही कारखान्यामुळे अत्यंत अडचणीत आलो असून, कर्जबाजारी झालो आहोत. त्यामुळे आमच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचा इशारा दिला. तसेच काहींनी संचालकाविरोधात आपला राग व्यक्त केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर संचालकावर गुन्हे दाखल करा आणि आमचे ऊसबिल द्यायला लावा, या मागणीवर शेतकरी ठाम राहिल्याने तहसीलदार विजय पाटील यांनी पोलिसांना बोलवूून यासंदर्भात ऊसउत्पादक शेतकºयांकडून येणाºया फसवणुकीच्या तक्रारींची दखल घेण्यास सांगितले.
पोलीस प्रशासनानेही गुन्हे दाखल करून घेण्यास संमती दिली. मात्र, ऊसबिलाची संपूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय जागेवरून उठणार नसल्याचा पवित्रा काहींनी घेतल्याने तणाव आणखी वाढत गेला. काहीच तोडगा निघत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी कारखान्याच्या संचालकांना येथे बोलावून घ्या. त्यांच्याकडून बिलाची रक्कम कधी मिळणार, हे लेखी लिहून द्या, अशी मागणी केली.
याप्रसंगी उपस्थित स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांनीही कारखान्याच्या संचालकांबरोबर ऊसउत्पादक शेतकºयांची बैठक घ्यावी, अशी मागणी केली. यावर तहसीलदार विजय पाटील यांनी कारखान्याचे चेअरमन प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधून ऊसउत्पादक शेतकºयांचे म्हणणे मांडले. यावर प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी ‘ऊस उत्पादक शेतकºयांची बिले देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्यापुढे बºयाच अडचणी आहेत. तरीसुद्धा आम्ही त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. येत्या एक तारखेपर्यंत बिलांची रक्कम देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऊस उत्पादकांनी एक तारखेपर्यंत धीर धरावा व नंतर आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घ्यावा,’ असे आवाहन केले. तसेच ‘कारखान्याच्या संचालकांना शुक्रवारी दुपारी एक वाजता तहसीलदार कार्यालयात पाठवून देतो. तुम्ही त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्या, आम्ही आमचे लेखी म्हणणे देतो,’ असे स्पष्ट केले.
यावर तहसीलदार विजय पाटील आणि दिगंबर आगवणे यांनीही आंदोलन मागे घेण्याची विनंती ऊस उत्पादकांना केली. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याचे स्वाभिमानीचे धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी सांगितले. दरम्यान, कारखान्याच्या संचालकांनी शुक्रवारी निर्णय जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महामुलकर यांनी दिला आहे....तर अधिकारी, कारखाना जबाबदारन्यू फलटण शुगर वर्क्समुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. अनेकजण बँका, सोसायटीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकलेले नाहीत. त्यांना जपतीच्या नोटिसा आलेल्या आहेत. अनेकजणांना उपचारासाठीही पैसे नसल्याने तेही अडचणीत आहेत. आता अनेकांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढावा. जर कोणत्याही ऊस उत्पादकाने आत्महत्या केली तर अधिकारी आणि कारखाना प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असा इशारा धनंजय महामुलकर यांनी दिला आहे.