कराड : कोरोनाच्या संकटामुळे सगळेच हतबल झाले आहेत. गेले वर्षभर या संकटामुळे सर्वच क्षेत्रात विस्कळीतपणा आला आहे. या संकटावर मात करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी प्रतिबंधात्मक लस आली आहे. पण त्याची टंचाई लोकांची धास्ती वाढवत आहे. या लसीचे दोन डोस घ्यायचे आहेत. अनेकांनी पहिला डोस घेतला आहे, दुसऱ्या डोसची तारीख मिळाली आहे; पण ती तारीख उलटून गेली तरी संबंधिताना दुसरा डोस मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे.
सातारा जिल्ह्यालासुद्धा या संकटाचा मोठा फटका बसला आहे. दररोज समोर येणारे बाधितांचे आकडे धडकी भरवणारे आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात सुरुवातीला जे निर्बंध लावण्यात आले होते, ते सध्या अत्यंत कडक करण्यात आले आहेत. तरीदेखील ‘ब्रेक द चेन’ला म्हणावे तसे यश येताना दिसत नाही.
दुसरीकडे आरोग्य विभागाने कोरोना चाचण्या वाढवल्या आहेत. बाधितांच्या संपर्कातील लोकांना शोधून त्यांची ही चाचणी केली जात आहे. आणि त्याचबरोबर कोरोनावर मात करण्यासाठी प्रतिबंधक लसीचे लसीकरण सुरू आहे. पण ही लसीकरण मोहीम अखंडपणे सुरू असल्याचे दिसत नाही. लसटंचाईमुळे यात वरचेवर खंड पडत आहे.
शासनाने ४५ वर्षांवरील लोकांना लसीकरण सुरू केले. त्यावेळी सुरुवातीला बऱ्याच लोकांनी लस घेतली. दुसरी लस किती दिवसांनी द्यायची याची तारीख संबंधित व्यक्तींना त्याच वेळी देण्यात आली. मात्र दुसऱ्या डोसची तारीख उलटून गेली तरी संबंधिताना ही लस मिळत नाही. ही आजची वस्तुस्थिती आहे.
लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक पहिली लस ज्या ठिकाणी घेतली त्याठिकाणीच हेलपाटे मारत असल्याचे दिसते. तेथे गेल्यावर त्यांना लस उपलब्ध नाही एवढेच उत्तर ऐकायला मिळत आहे. बरं, लस नेमकी कधी उपलब्ध होईल, याचीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दररोज फक्त हेलपाटे मारणे त्यांच्या नशिबी आले आहे. त्यातच शासनाच्या कडक निर्बंधामुळे त्याचाही त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.
सुरुवातीला दुसरा डोस घेण्याची मुदत एक महिन्याची दिली होती. पण आज तो डोस मिळत नाही. मग दुसरा डोस उशिरा घेतला तर चालेल का? किती उशीर झाला तर चालू शकतो? वेळेत डोस घेतला नाही म्हणून काही दुष्परिणाम होतात का, असे अनेक प्रश्न दुसरा डोस घेण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या लोकांच्या मनात आहेत. पण त्याचे समाधानकारक उत्तर त्यांना देण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही. त्यामुळे दुसरा डोस कधी मिळणार एवढाच प्रश्न त्यांना भेडसावत आहे.
चौकट
खासगी रुग्णालयांची अडचण ...
कोरोना संबंधित प्रतिबंधक लसीकरण खासगी रुग्णालयातही केले जात होते. फक्त तेथे लस घेणाऱ्या लाभार्थींकडून शुल्क आकारले जात असे. मध्यंतरीच्या काळात बऱ्याच लोकांनी खासगी रुग्णालयात जाऊन लस घेतली आहे. त्यांना दुसऱ्या डोसची तारीख देण्यात आली आहे. मात्र तेथे सध्या लस उपलब्ध होत नसल्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.
- चौकट
कराड तालुक्याची स्थिती
एकूण लसीकरण - १०,०६९८
शासकीय रुग्णालय : ७८,१८०
खासगी रुग्णालय : २२,५१८
- चौकट
अशी आहे लसीकरणाची माहिती
लाभार्थी : पहिला डोस : दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी : ९२६० : ५०४०
फ्रंटलाइन वर्कर : ६२१६ : २५४८
४५ ते ६० वर्ष : ३६,००१ : १९०३
६० वर्षापुढील : ३६,४१६ : ३३१४
एकूण लसीकरण : ८७,८९३ : १२,८०५
कोट
कराड तालुक्यात बुधवारी दोन हजार कोरोना लस उपलब्ध झाल्या आहेत. त्या विविध केंद्रावर वितरित करण्यात येणार आहेत. पण ही लस ज्यांचे दुसरे डोस बाकी आहेत त्यांनाच देण्यात येणार आहे. दुसरे डोस देणे संपल्यावर पहिली लस देणे सुरू करण्यात येणार आहे.
डॉ. संगीता देशमुख,
तालुका वैद्यकीय अधिकारी, कराड