सातारा : जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी बुधवारी मान्यता दिली. शनिवारी (दि. २ जुलै) प्रत्येक नगरपालिकेच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आठ नगरपालिकांची डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत मुदत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने केलेल्या निर्देशानुसार सातारा, कऱ्हाड, वाई, फलटण, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड या आठ नगरपालिकांमधील निवडणूक कक्षांद्वारे शहरातील प्रभागांचा प्रारूप आराखडा, त्यांची संख्या, प्रभागनिहाय एकूण क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती-जमाती आरक्षण यांचा प्रस्ताव २४ जूनला जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. प्रस्तावाच्या मंजुरीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला सर्व पालिकांचे मुख्याधिकारी व निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना मुख्याधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रारूप आराखड्याला मंजुरी दिली. दि. २ जुलैला सकाळी ११ वाजता पालिका सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : सातारा : शाहू कला मंदिर, फलटण : प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह, कऱ्हाड : स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्र, वाई : श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, महाबळेश्वर : कै. भाऊसाहेब माळवदे सभागृह, पाचगणी : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, रहिमतपूर : चं. न. बसवेश्वर सांस्कृतिक भवन, म्हसवड : नगरपालिका सभागृह याठिकाणी पालिका सदस्यांच्या आरक्षणाची सोडत होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी स्थानिक नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. लॉटरी पद्धतीने आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत. चिठ्ठ्या काढण्यासाठी स्थानिक शाळांतील प्रत्येकी पाच विद्यार्थी निवडण्यात येणार आहेत.प्रभाग रचनेचीघोषणा सोडतीनंतरनिवडणूक लागलेल्या शहरांतील नागरिकांना प्रभागांची रचना कशी असणार, नगरसेवकांची आरक्षणे कशी असणार? याबाबत उत्सुकता लागलेली आहे; परंतु याची माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली असून, ही माहिती आरक्षण सोडतीनंतर शनिवारी (दि. २ जुलै) जाहीर केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी लेखी आदेश दिल्याचे निवडणूक विभागातील सूत्रांनी सांगितले.
प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता
By admin | Published: June 29, 2016 11:54 PM