सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने आणि उपलब्धतेनुसार पूर्ण क्षमतेने सुरू असून, शनिवारी एका दिवसात ३७० सत्रांमधून तब्बल ६०,६६४ लोकांना लस टोचण्यात आली. हा एका नवा विक्रम ठरला आहे. तर आतापर्यंत १६ लाख २५ हजार नागरिकांना लसीचा डोस देण्यात आला आहे.
कोरोना रोखण्यासाठी लस ही उत्कृष्ट आणि सुरक्षित शस्त्र ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मागील ७ महिन्यांपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १६ लाख २५ हजार ७९३ लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. यामध्ये ११ लाख ३४ हजार ६७३ नागरिकांना पहिला डोस मिळालाय तर ४ लाख ९१ हजार १२० लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यासाठी एकूण ३७० ठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे. यामधील ३४२ शासकीय केंद्रे आहेत तर २८ खासगी केंद्रांत लसीकरणाचा लाभ देण्यात येत आहे.
जिल्ह्याला लस उपलब्ध होत आहे, त्यापद्धतीने सर्वांना न्याय मिळेल अशारितीने लस वाटप केले जात असते. यासाठी आरोग्य विभाग तसेच इतर कर्मचारी काटेकोरपणे नियोजन करत आहेत. लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. लसीकरणाबद्दलचे गैरसमज दूर करण्यावरही विविध पातळ्यांवर भर दिला जात आहे. अनेक ठिकाणी लसीकरणाला योग्य प्रतिसाद मिळत आहे. ज्याठिकाणी कमी प्रतिसाद आहे, तेथे घरोघरी जाऊन प्रबोधन करण्यावर भर दिला जात आहे.
आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, प्राथमिक शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी तसेच गावनिहाय विशेष नियुक्त पालक अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यापासून ते गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी अशा सर्वच स्तरातील कर्मचारी, अधिकारी यासाठी प्रयत्न करत आहेत.
कोट :
जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. शनिवारी एका दिवसात ६० हजारांवर नागरिकांना लस देण्यात आली. त्याचबरोबर माहितीपत्रके, पुस्तिका, पोस्टर्स अशा मार्गांनी लसीबाबत लोकांत प्रबोधन करण्यात येत आहे. नागरिकांनी लसीकरणाला असाच प्रतिसाद द्यावा तसेच सामाजिक अंतर पाळणे, मास्क लावणे, वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीचा सातत्याने अवलंब करणे आवश्यक आहे.
- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\