लोकमत न्यूज नेटवर्क
औंध : दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या खटाव तालुक्यातील वडी येथील शेतकऱ्याने आपल्या ५० गुंठे क्षेत्रात ५१ टन म्हणजे आले पिकाच्या बागेत १०२ गाडी एवढे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांच्या या विक्रमी उत्पादनाची परिसरात चर्चा सुरू आहे.
वडी येथील वसंत रामचंद्र यादव यांनी १० मे २०२० रोजी ५० गुंठे क्षेत्रात आल्याची लागण केली. ५० गुंठ्यांत त्यांनी १५ ट्रेलर शेणखत, १६ टन मळी टाकली. उन्हाळ्यात नांगरट करून रोटर मारून बेड सोडले. त्यानंतर डबल रोटर मारून बेड सोडून ठिबक व्यवस्थापन वापरून साडेचार फूट सरी सोडून लागण केली. वेळोवेळी कृषिधन ॲग्रोचे सुधीर सुरेश कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली आले पिकाची योग्य देखभाल केली. सुयोग्य नियोजनाने वेळोवेळी पिकाची मशागत, मेहनत करून मोठ्या जिद्दीने पीक आणले. कमी पाणी व सूक्ष्म नियोजन करून दुष्काळी परिस्थितीशी तोंड देऊन त्यांनी आणलेल्या पिकाचे उत्पादन पाहण्यासाठी या भागातील लोकांनी भेटी दिल्या आहेत. सद्य:स्थितीत दर कमी असूनही त्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट पैसे मिळाले आणि विशेष म्हणजे चार महिने अगोदरच पीक काढूनही त्यांना विक्रमी उत्पादन मिळाले. वडी येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी दिल्या जाणाऱ्या शेतीरत्न पुरस्काराचे वसंत यादव मानकरी ठरले आहेत.
कोट..
आले पीक व्यवस्थापनात वेळेला खूप महत्त्व आहे. कोणत्याही गोष्टीत म्हणजे भांगलण, औषध, खत, कीटकनाशके, पाणी हे योग्य वेळेतच केले पाहिजे. त्यामुळेच भरघोस उत्पन्न निघाले तसेच वेळोवेळी सुधीर कणसे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
-वसंत यादव, शेतकरी वडी
प्रतिक्रिया २)
माझ्या सल्ल्यानुसार आले पिकावर योग्यवेळी वसंत यादव यांनी पिकाची देखभाल केल्याने चांगले उत्पन्न मिळाले. अनेकवेळा त्यांच्या प्लॉटला भेट देऊन मार्गदर्शन केले आहे.
- सुधीर कणसे, कृषिधन ॲग्रो, पुसेसावळी.
२३औंध
फोटो:-खटाव तालुक्यातील वडी येथील वसंत यादव यांचे आल्याचे पीक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. (छाया: रशिद शेख)