सातारा : पावसाळ्यात भटकी कुत्रे आडोसा शोधण्यासाठी घराजवळचे मैदान, पार्किंगचा आसरा घेतात. पाहता पाहता त्यांचा तेथेच मुक्काम होतो. मग परिसर घाण करणे, मुलांवर हल्ले करण्याच्याही घटना घडतात. हेच टाळण्यासाठी सातारकरांनी नामी शक्कल लढविली आहे. कुंकूमिश्रीत लाल पाणी भरलेल्या बाटल्या अंगणात ठेवत आहेत.पाळीव कुत्र्यांसाठी घरातच चांगली सोय केलेली असते. काहीजण त्याच्यासाठी पिंजरा करतात. त्यामुळे कितीही पाऊस झाला तरी कुत्र्यांना कसलाच त्रास होत नाही. वेळच्या वेळी पिंजऱ्याची स्वच्छता केली जाते. पावसाचे पाणी आत जाऊ नये म्हणून चढ केला जातो. तसेच थंडी वाजू नये म्हणून पोते ठेवून ऊब तयार केली जाते.शहरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाणही जास्त आहे. रस्त्यावर, चौकाचौकात कुत्र्यांचे टोळके वावरत असते. पाऊस पडायला सुरू झाला की कुत्र्यांची पळापळ होते. घर, वसाहतींचा जिना, पार्किंग, दुकानांच्या पायºया, घरासमोरील बागेतील झाडांच्या खाली कुत्रे आडोशासाठी थांबतात.घराच्या परिसरात आलेले कुत्र्यांकडून लहान मुलांवर हल्ले होण्याचे प्रकारही वारंवार घडत असतात. तसेच परिसरात प्रचंड घाण केली जाते. यामुळे अनेकजण वैतागत असतात. कुत्र्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला तर अंगावर धाऊन येणे किंवा चावा घेण्याचा धोका असतो.
पावसात वीज गेल्यानंतर कोण तेथून जात असतील तर लहान मुलांना धोका जास्त असतो. त्यामुळे वैतागलेल्या सातारकरांनी नवी शक्कल शोधून काढली आहे. कुंकू टाकून केलेले लाल पाणी बाटली भरून त्या बाटल्या अंगणात, दारात किंवा कुंपणाला बांधत असतात. त्यामुळे फरकही पडत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.