चोरट्यांचा धुमाकूळ
सातारा : जिल्ह्यात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून तर हे सातत्याने सुरूच आहे. फलटण, सातारा शहरासह तालुक्यातील आरळे येथून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दुचाकीच्ता हँडल जोरात हिस्का देऊन हँडललॉक उघडून या चोऱ्या होतात.
वीज तोडू नका
सातारा : शेतकऱ्यांची थकीत वीजबिलापोटी वीज जोडणी तोडल्यास शेतकरी संघटनेचे महिला पथक धडा शिकवेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते अनिल घराळ यांनी दिला. याबाबत वीज वितरणचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांना संघटनेकडून निवेदन देण्यात आले.
धुळेश्वर यात्रा रद्द
कऱ्हाड : धनगर समाजाचे तीर्थक्षेत्र असलेली नाडोली (ता. पाटण) येथील धुळेश्वर यात्रा यंदा २ एप्रिल रोजी आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सूचनांनुसार ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. यंदा केवळ १० प्रमुख मानकऱ्यांच्या उपस्थितीत प्रथेनुसार पालखी सोहळा व इतर विधी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
वक्तृत्व स्पर्धेत यश
सातारा : कोल्हापूर येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे झालेल्या यशवंत उत्सव या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर येथे झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत टिळक हायस्कूल व लाहोटी कन्याप्रशालेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
माळी यांचे व्याख्यान
सातारा : महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली यांच्यावतीने संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांसाठी ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेत जीवन विद्या मिशनचे व्याख्याते मारुती माळी यांचे व्याख्यान झाले.