कऱ्हाड : गुहाघर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी रिफ्लेक्टर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. महामार्गावर ज्या ठिकाणी छेदरस्ता आहे, अशा ठिकाणी रिफ्लेक्टर बसवून पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी ब्लिंकर्सही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक निर्धाेक होण्यास मदत झाली आहे.
साईडपट्ट्या खचल्या
कोपर्डे हवेली : कऱ्हाड-मसूर मार्गावरील रस्त्याकडेला असलेल्या साईडपट्ट्या ठिकठिकाणी खचल्या आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. खचलेल्या साईडपट्ट्यांवरून दुचाकी वाहने जात असताना वाहनचालकाचा तोल जाऊन अपघात होत आहेत. रस्त्याच्या साईडपट्ट्या भरण्याची मागणी प्रवाशांसह वाहनधारकांतून केली जात आहे.
फलक सुस्थितीत
कऱ्हाड : शहरातील महत्त्वाचे चौक, ठिकाणे तसेच मार्गाबाबत माहिती देणारे सूचना व दिशादर्शक फलक महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे शहरात बाहेरच्यांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. मात्र, तालुक्यातील शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी शहरात घेऊन येत असल्याने त्यांना दिशादर्शक फलकांमुळे ठिकाणांची माहिती होत आहे.
गटार तुंबली
कऱ्हाड : शहरातील मंडईच्या परिसरात असलेली गटार सातत्याने तुंबलेल्या अवस्थेत असून, त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. बुधवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर पावसाचे पाणी नाल्यांमधून प्रवाहित झाले नाही. परिणामी मंडईत अनेक ठिकाणी तळे साचले होते. गटार तुंबल्याने परिसरात दुर्गंधीही पसरत असून, पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.