मसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाचा प्रारंभ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंचायत समितीच्या माजी सभापती शालन माळी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी डॉ. लोखंडे बोलत होते. जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे, तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सदस्या संगीता साळुंखे, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच तथा जिल्हा सनियंत्रण समिती सदस्य विजयसिंह जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम दीक्षित, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. रमेश लोखंडे म्हणाले, ४५ ते ५९ वयोगटांतील ज्या लाभार्थ्यांना मधुमेह, रक्तदाब, दमा यासारखे व इतर आजार असतील त्यांना ही लस घेता येईल. त्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. साठ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. ही लस अत्यंत सुरक्षित असून वरील वयोगटातील सर्व नागरिकांनी ती घेऊन स्वत:चे कोरोनापासून संरक्षण करावे. मात्र, गरोदर माता, स्तनदा माता व अठरा वर्षांखालील व्यक्तींना ही लस देता येणार नाही. या लसीकरणानंतर किरकोळ अंगदुखी व सौम्य ताप येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्व नागरिकांनी आपली नोंदणी ग्रामपंचायत स्तरावर करावी.
यावेळी मानसिंगराव जगदाळे, संगीता साळुंखे यांचे भाषण झाले. डॉ. राजेंद्र डाकवे यांनी आभार मानले.