सातारा : खासगी रुग्णालये सुरू करायची झाल्यास डॉक्टरांना बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार नोंदणी बंधनकारक असते. सातारा जिल्ह्याचा विचार करता २००६ पासून जिल्हा परिषदेकडे २४७० खासगी रुग्णालयांचीच नोंद झालेली आहे; तर २०१६ पासून ४१६ रुग्णालयांची नोंद आहे. तसेच दर तीन वर्षांनी खासगी रुग्णालयांनी नूतनीकरण करणे आवश्यक असते.
ग्रामीण भागात सुरू करण्यात येणाऱ्या खासगी रुग्णालयांची नोंद जिल्हा परिषदेत होत असते. तशी परवानगी घेणे बंधनकारक आहे. २०१९ मध्ये जिल्हा परिषदेत ज्या खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत, अशांना नोंदणीचे बंधन करण्यात येऊ नये, असा ठराव झाला आहे.
४१६
सन २०१६ पासून नोंदणीकृत खासगी रुग्णालये
तालुकानिहाय आकडेवारी
सातारा५०
जावळी ११
महाबळेश्वर ४
वाई ११
खंडाळा ७०
फलटण ६
माण ६२
खटाव ६६
कोरेगाव ४७
कऱ्हाड ४२
पाटण ४७
२०२० वर्षात १२ रुग्णालयांची नोंदणी
सन २०२० या वर्षात जिल्ह्यातील नवीन १२ खासगी रुग्णालयांची नोंद जिल्हा परिषदेत झाली आहे. यामध्ये माण तालुक्यातील ३, सातारा तालुका २, खटाव २, वाई ८, जावळी १ आणि कऱ्हाड व फलटण तालुक्यांतील प्रत्येकी एका रुग्णालयाची नोंद झाली.
नोंदणी न केल्यास होणारी कारवाई
खासगी रुग्णालये सुरू करताना बेड असल्यास जिल्हा परिषदेकडे नोंद बंधनकारक आहे. तसे न झाल्यास रुग्णालय चालविता येत नाही. अशा रुग्णालयांवर संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, तालुका आरोग्याधिकाऱ्यांचे नियंत्रण असते.
खासगी रुग्णालयांनी माहिती देणे बंधनकारक
खासगी रुग्णालयांनी बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार जिल्हा परिषदेकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच स्टाफ, बेड किती तसेच इतर माहिती देणे आवश्यक असते; तर परवानगी घेणाऱ्या खासगी रुग्णालयांना तीन वर्षांनी नूतनीकरण करावे लागते. परवानगी नसल्यास ते अडचणीचे ठरू शकते.
- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्याधिकारी