वाई : कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी फलटण पालिकेने कोळकी येथील स्मशानभूमी ताब्यात घेतली आहे. तेथे काही दिवसांपूर्वी एक तरुण जळत असलेल्या सरणावरून काहीतरी काढून खात असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले होते. त्यानंतर त्याला तेथून हाकलून लावत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पुनर्वसन आता वाईतील यशोधन संस्थेत करण्यात आले.
भूक माणसाला काहीही करायला लावते. पाेटातील आग विझवण्यासाठी प्रत्येक जण धडपड असताे. अशातच कोरोना संकटामध्ये अनेक हातावरचे पाेट असणार्या लाेकांचे जगणे अवघड झाले आहे. या महामारीत अनेकांचे हाल झाले आहेत. असाच धक्कादायक प्रकार फलटण येथे काही दिवसांपूर्वी घडला हाेता. कोरोना रुग्णाचे मृतदेह जाळण्यासाठी काेळकी ग्रामपंचायतची स्मशानभूमी घेतली आहे. या ठिकाणी राेजच कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यविधी केला जाताे.
या स्मशानभूमीत अंदाजे २० वर्षांचा तरुण मुलगा जळत असणार्या सरणातून काढून काहीतरी खात असल्याचे निदर्शनास आले हाेते. त्याला नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी हटकलेे; परंतु त्याला लागलेल्या भुकेने ताे व्याकुळ झाला हाेता. त्याला त्या ठिकाणाहून हटकून पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
त्याचे काेविडकाळात पुनर्वसन काेठे करायचे हा प्रश्न प्रशासनापुढे हाेता. मुख्याधिकाऱ्यांनी यशाेधन ट्रस्टचे संचालक रवि बाेडके यांच्याशी संपर्क करत त्याला यशाेधन ट्रस्टमध्ये घेण्याची विनंती केली. रात्री उशिरा पाेलिसांनी सर्व कागतपत्रांची पुर्तता केली. त्याची कोरोना चाचणीही करण्यात आली. यामध्ये ती निगेटिव्ह आली आहे. पाेलीस बंदाेबस्तामध्ये यशाेधन ट्रस्टच्या वेळे येथील आश्रमात त्याची साेय करण्यात आली आहे.
सकाळी कवठे आराेग्य केंद्रात त्याची वैद्यकीय तपासणी, कोरोनाची टेस्ट केली आहे. त्याच्यावरती मानसोपचार तज्ज्ञांच्या उपचाराची गरज असून, लवकरच उपचारासाठी सातारा या ठिकाणी घेऊन जाणार असल्याची माहिती रवि बोडके यांनी दिली.