मुराद पटेलशिरवळ : विंग ता.खंडाळा येथील रियटर इंडियाच्या संपकरी कामगारांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. खासदार उदयनराजे भोसले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत तोडगा काढण्याकरिता कंपनी व्यवस्थापन, संपकरी कामगार, जिल्हाधिकारी यांची येत्या सोमवारी (दि.11) बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती दिल्यानंतर संपकरी कामगारांनी उपोषण स्थगित केले. यावेळी संपकरी कामगारांनी उदयनराजे भोसले यांच्या हस्ते लिंबू सरबत घेत उपोषण स्थगित केले. रियटर इंडियाच्या कामगारांनी विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून ठिय्या आंदोलन पुकारले आहे. यामध्ये कंपनी प्रशासन, संपकरी कामगार यांच्यामध्ये तोडगा काढण्याकरिता सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या निर्देशानंतर वाई प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस, खंडाळा तहसीलदार अजित पाटील, शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी खंडाळा येथे बैठक घेतली असता तोडगा निघाला नाही. यावेळी संपकरी कामगारांनी थेट सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. खासदार उदयनराजे भोसले यांनी याप्रश्नी मध्यस्थी करीत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संपकरी कामगार यांची बैठक घेत या संपाबाबत तोडगा काढण्याकरिता येत्या सोमवारी कंपनी प्रशासन, संपकरी कामगार व खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्याचे निश्चित झाल्यानंतर संपकरी कामगारांनी समाधान व्यक्त करीत उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली.
रियटरच्या कामगारांचे उपोषण स्थगित, तोडगा काढण्यासाठी येत्या सोमवारी बैठक होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 12:21 PM