खंडाळा : ‘खंडाळा तालुक्यातील कोरोनाग्रस्त लोकांना अधिक सोयीस्कर उपचार मिळावेत, यासाठी प्रशासन पातळीवर विविध उपाययोजना सुरू आहेत. तालुक्यात अहिरे, लोणंद, शिरवळ या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांतून कोरोना रुग्णांना उपचाराच्या सुविधा चांगल्यारीतीने पुरविण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांना अधिकचे उपचार मिळावेत, यासाठी तातडीने कोरोना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिका वितरित करण्यात आल्या आहेत. कोरोनाकाळात ग्रामीण भागातील रुग्णांना यामुळे दिलासा मिळेल,’ असे मत आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केले.
कोरोनाचा भविष्यातला धोका ओळखून खंडाळा तालुक्यातील अहिरे, लोणंद व शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा परिषदेच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचे लोकार्पण आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, सभापती राजेंद्र तांबे, जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार, दीपाली साळुंखे, पंचायत समिती सदस्य मकरंद मोटे, तहसीलदार दशरथ काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अजय भोसले, बाळासाहेब साळुंखे, डॉ. नितीन सावंत, गजेंद्र मुसळे, नितीन ओव्हाळ, हणमंत शेळके, सागर शेळके यासह प्रमुख उपस्थित होते.
ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांना कोरोनाच्या उपचारासाठी इतरत्र हलवावे लागते. आता रुग्णवाहिकेच्या सुविधेमुळे अत्यवस्थ रुग्णांना लवकर उपचार मिळण्यास मदत होणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकेअभावी येणाऱ्या अडचणी दूर होऊन कामकाज करणे अधिक सोयीस्कर होणार आहे.
...................................