तळमावले : पाटण तालुक्यातील तळमावले व ढेबेवाडी विभागात कोळपणीच्या कामांना वेग आला आहे. शिवारामध्ये सगळीकडे शेतकरी शेतामध्ये कोळपणीचे काम करताना दिसत आहेत. मान्सूनपूर्व आणि पेरणीनंतर पाऊस झाल्यामुळे सर्व पिके चांगली आली आहेत. काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, मका, भात व इतर कडधान्य पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पिकांना पोषक वातावरण होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.
कर्ज हप्त्यांना स्थगिती देण्याची मागणी
कऱ्हाड : कोरोनाच्या कालावधीत अनेकांचे व्यवसाय, उद्योगधंदे बंद पडले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांची तर सध्या उपासमार सुरू आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनच्या कालावधीतील फायनान्स, बँक, बचत गटांच्या कर्जाचे हप्ते फेडायचे कसे, असा प्रश्न अनेकांपुढे निर्माण झाला आहे. तर लॉकडाऊनच्या कालावधीत कर्जाच्या हप्त्यांना स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन विविध संघटनांनी प्रशासनाला दिले आहे.
शेतमाल विक्रीवर लॉकडाऊनचा परिणाम
कऱ्हाड : लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून शेतकरी अडचणीत आले आहेत. भाजीपाला मार्केट बंद असल्याने शेतीमाल विक्री ठप्प झाली आहे. गत काही दिवसांपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. आठवडी बाजारही बंद आहेत. भाजीपाला विक्रीला मुभा असली तरी त्यालाही वेळेचे बंधन असून ग्राहकांनीही पाठ फिरवल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.
आजार रोखण्यासाठी फवारणीची मागणी
कऱ्हाड : शहरातील वाढीव हद्दवाढ भागातील अनेक गटारांची सफाई पालिकेने केलेली नाही. ती साफसफाई तातडीने करावी, अशी मागणी होत आहे. शहरात संसर्गजन्य आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधक फवारणीची गरज आहे. त्यासाठी पालिकेने कार्वे नाक्यापासून पूर्व व पश्चिम भागातील सर्व भागांमध्ये फवारणी करणे गरजेचे आहे. फवारणीचे वेळापत्रक आखून पालिकेने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.