सातारा : गेले पंधरा दिवस बंद असलेले ‘पर्ल्स अॅग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड’चे सातारा येथील कार्यालय सोमवारी सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील सात हजारांहून अधिक ठेवीदारांना थोडे हायसे वाटले. दरम्यान, ‘पर्ल्स’च्या आर्थिक व्यव्हारावर ‘सेबी’ने निर्बंध आणल्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळतील की नाही, याविषयी अजूनही सांशकता आहे. ‘पर्ल्स अॅग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड’ तथा ‘पीएसील’ने जिल्ह्यातील सात हजारांहून अधिक ठेवीदारांना ठकवले आहे. यामध्ये अडकून पडलेली रक्कम जवळपास सहाशे कोटींच्या आसपास आहे. या कंपनीच्या विरोधात गेले पंधरा दिवस झाले जिल्ह्यात संतापाचे वातावरण असून, सातारा जिल्ह्यातून आठशेहून अधिक तक्रारी अण्णा हजारे भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीकडे दाखल झाल्या आहेत. यासाठी विशेष कृती समिती स्थापन करण्यात आली असून, अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, तात्या सावंत, सर्जेराव पाटील, मिलिंद कासार, चाँदगणी आत्तार आणि त्यांचे सहकारी त्यामध्ये कार्यरत आहेत. या तक्रारी गणेश पाटणे आणि सातारा येथील माजी सैनिक चंद्रकांत घाडगे तसेच त्यांचे सहकारी तक्रारी लिहून घेत आहेत.सोमवारी ‘पर्ल्स’चे कर्मचारी नियोजित वेळेनुसार कार्यालयात दाखल झाले. यावेळी ठेवीदारांनी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याचवेळी गणेश पाटणे आणि त्यांचे सहकारी येथे ठेवीदारांच्या तक्रारी लिहून घेत होते. पर्ल्सच्या कर्मचाऱ्यांना ही बाब निदर्शनास आल्यानंतर पाटणे यांना येथून बाहेर जाण्यास सांगितले. पाटणे येथून खाली आले आणि त्यांनी खालीच तक्रारी घेण्यास सुरुवात केली. मात्र, कंपनीच्या काही एजंटानी त्याला धमकावल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, पर्ल्सचे जिल्हा कार्यालय सोमवारी उघडल्यामुळे ठेवीदारांना हायसे वाटले तरी पैसे परत मिळतील का नाही, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
ठेवीदारांना दिलासा : कृती समितीकडे सातशे तक्रारी दाखल
By admin | Published: November 17, 2014 10:44 PM