सचिन काकडेसातारा : प्राचीन खेळ संवर्धन मोहीमअंतर्गत राज्यभर ऐतिहासिक प्राचीन पटखेळांच्या अवशेषांचा शोध व संवर्धनाचे कार्य सुरू असून, सातारा जिल्ह्यातही पटखेळांचे अवशेष शोधण्यात अभ्यासकांना यश आले आहे. नाशिकचे पुरात्वज्ञ सोज्वळ साळी व साताऱ्याच्या साक्षी महामुलकर या अभ्यासकांनी किकली (ता. वाई) येथील पुरातन भैरवनाथ मंदिरात प्राचीन पटखेळांचे संशोधन केले असून, साताऱ्याच्या इतिहासात ही मोलाची भर म्हणावी लागेल.
किकलीतील भैरवनाथ मंदिर बारा ते चौादाव्या शतकातील असून, यादवकालीन स्थापत्याचे आणि भूमीज मंदिरशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. याच मंदिरात एकूण सात पटखेळांचे पुरातत्त्वीय अवशेष आढळून आले आहेत. यात नवकंकरी, वाघ - बकरी, पंचखेलिया आणि अष्टचल्लस या प्राचीन बैठ्या खेळांचा समावेश आहे. प्राचीन इजिप्त, रोम, नेपाळ तसेच प्राचीन सिलोन म्हणजेच आताचे श्रीलंका याठिकाणी या खेळांचे उगम व संदर्भ सापडताना दिसतात. या ठिकाणी आपला समृध्द प्राचीन व्यापार चालत असे. त्यामुळेच विविध प्रांतातील हे खेळ व्यापारमार्गे अनेक व्यापाऱ्यांमार्फत इथे कोरून ठेवल्याचे दिसते. हे खेळ म्हणजे जगभरातील संस्कृतीच्या अन् प्राचीन व्यापारी मार्गांच्या खुणा आहेत. म्हणूनच लिखित साधनांनंतर आता साताऱ्यातील या पुरातत्त्वीय संशोधनामुळे कऱ्हाडसह वाईचा भाग हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन व्यापारी मार्ग होता, यालाही दुजोरा मिळत आहे.
किकलीतील भैरवनाथ मंदिरात प्राचीन पटखेळ मिळाले आहेत. असेच खेळ अजून मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, हे खेळ सापडले असले तरी यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुरातत्व विभाग, स्थानिक प्रशासन व गावकरी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. - सोज्वळ साळी, पुरातत्वज्ञ
जिल्ह्यात प्रथमच सापडलेले प्राचीन पटखेळांचे अवशेष म्हणजे प्रत्येकासाठी आनंदाची गोष्ट आहे. हा ऐतिहासिक ठेवा इथल्या सर्वसामान्यांचा आहे, जो प्राचीन भारताच्या गौरवशाली आंतरराष्ट्रीय व्यापाराशी निगडीत आहे. म्हणूनच त्याच्या प्रचार - प्रसाराबरोबरच त्याचे जतन संवर्धन गरजेचे आहे. - साक्षी महामुलकर, इतिहास अभ्यासक