सातारा : मैत्रिणीबाबत अपशब्द वापरल्याचा राग मनात धरून एकाने शिरवळ बसस्थानकातील सुलभ शौचालयाचे चालक रणजित गणपतराव जाधव (वय ४०, रा. बौद्ध आळी, शिरवळ) यांचा गळा आवळून आणि डोके आपटून खून केल्याचे उघडकीस आले आहे. शिरवळ पोलिसांनी विनोद भीमराव वावळे (रा. शिरवळ मूळ रा. नाव्हा, ता. पालम, जि. परभणी) याला याप्रकरणी अटक केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी गुन्हा कसा उघडकीस आणला त्याबाबत पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की, शुक्रवारी (दि.२०) शिरवळ बसस्थानकात असलेल्या सुलभ शौचालयाचे चालक रणजित जाधव यांचा खून झाल्याची घटना समोर आली होती. शिरवळ पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करीत होते.
या खून प्रकरणातील संशयित वावळे यानेच जाधव यांचा खून केला आणि आता तो परभणीला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली होती. धुमाळ यांनी तातडीने सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, रमेश गर्जे यांना सूचना करून वावळे याला ताब्यात घेण्याबाबत कळविले होते. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने शिरवळ बसस्थानक परिसरात सापळा लावल्यानंतर संशयित वावळे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शिरवळ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने दारूच्या नशेत झालेल्या वादातून जाधव यांचा खून केल्याची कबुली दिल्यावर त्याला अटक करून शिरवळ पोलिसांच्या ताब्यात दिले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, उपाधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, महेश इंगळे, आनंदसिंग साबळे, रमेश गर्जे, फौजदार सागर आरगडे, सहायक फौजदार उत्तम दबडे, तानाजी माने, हवालदार संतोष सपकाळ, मोहन नाचण, राजकुमार ननावरे, अजित कर्णे, नीलेश काटकर, नितीन गोगावले, वैभव सावंत यांच्यासह शिरवळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.