पुसेगाव : पुसेगाव (ता. खटाव) येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाचे ‘श्री सेवागिरी कला व वाणिज्य महाविद्यालय’ असे नामकरण करावे, अशी मागणी पुसेगाव ग्रामस्थांनी बुधवारी झालेल्या ग्रामसभेत केली, तसा ठरावही पारित करण्यात आला आहे.
पुसेगाव येथे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सन १९९४ पासून कला व वाणिज्य शाखेचे वरिष्ठ महाविद्यालय सुरू आहे. ‘कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव’ नावाने गेले २५ वर्षे सुरू असलेल्या या महाविद्यालयाचे नाव बदलण्यासाठी काही व्यक्तींच्या माध्यमातून ग्रामस्थांना विचारात न घेता रयत संस्थेपर्यंत प्रयत्न सुरू आहेत. याबाबत बुधवारी झालेल्या पुसेगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत या महाविद्यालयास गावाची अस्मिता व पुसेगाव पंचक्रोशीसह महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांचे नाव देण्यात यावे, असा ठराव समीर हिंदुराव देशमुख यांनी मांडला. त्याला शहाजी बाबूराव जाधव यांनी अनुमोदन दिले. त्यानुसार ‘श्री सेवागिरी कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव’ असे नामांतर करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
दरम्यान, काही व्यक्तींच्या मर्जीखातर या महाविद्यालयाचे ‘बॅरिस्टर पी. जी. पाटील कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव’ असे नामकरण करण्यात यावे, असा ठराव ग्रामपंचायतीच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मासिक बैठकीत करून घेण्यात आला असल्याची ग्रामसभेत चर्चा होती. मात्र, बुधवारी झालेला ठराव हा ग्रामसभेत झाला असल्याने या ठरावाला महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्ञानमंदिराच्या नामांतराचा वाद वाढू नये, याबाबत संबंधितांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच गावकऱ्यांच्या श्री सेवागिरी महाराजांविषयी असलेल्या भावना विचारात न घेता, अगदी स्थानिक व्यवस्थापन समितीने ही महाविद्यालयाचे नामांतर केलेच तर पुसेगावकर वेगळी भूमिका घेतील, असे मत काही ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
कोट...
श्री सेवागिरी महाराजांच्या नगरीत १९९४ पासून रयत शिक्षण संस्थेचे वरिष्ठ महाविद्यालय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. स्थानिक व्यवस्थापन समितीसह सर्वच ग्रामस्थांचे उत्तम सहकार्य या महाविद्यालयास असतेच. महाविद्यालयाच्या नामांतराबाबत आमची रयत शिक्षण संस्था व पुसेगाव ग्रामस्थ याबाबत नक्कीच सुवर्णमध्याची भूमिका साधतील.
- प्राचार्य डॉ. के. बी. जगदाळे, पुसेगाव