लोकमत न्यूज नेटवर्क
पुसेसावळी : विटा-महाबळेश्वर रस्त्याचे चोराडे गावाजवळचे काम अंतिम टप्प्यात पूर्णत्वाकडे चालले आहे. तरी गावाजवळील चोराडे फाटा येथे या रस्त्याच्या ठेकेदाराने ‘पंढरपूर फाटा’ असे नाव दिले होते. हा प्रकार नुकताच उघड झाला होता. संबंधित ठेकेदाराने चूक दुरुस्त केली आहे. त्याला पुन्हा ‘चोराडे फाटा’ असे नाव दिले आहे. यामुळे ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.
याबाबतची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने चोराडे फाटा बसस्थानकाला दिलेले पंढरपूर फाटा हे नाव बदलून चोराडे फाटा हे नाव दिले. तरी चोराडे गावातील ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास चूक आणून दिल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदारांशी संपर्क साधून त्या ठिकाणचे नाव बदलले आहे. त्यामुळे वाहनचालकांची फसगत थांबली आहे. विटा-महाबळेश्वर रस्त्याच्या बाबतीत ग्रामस्थ सतर्क असल्याने काम चांगल्या प्रतीचे झाले आहे. अजूनही गावातील रस्त्याच्या बाबतीत अडचणी आहेत. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी सोडवाव्यात, अशी मागणी आहे.
चौकट :
विटा-महाबळेश्वर रस्ता रुंद झाल्यामुळे वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. त्यामुळे वाहन चालकांना हा नक्की कोणता फाटा आहे हे कळत नसल्याने ग्रामस्थांची मागणी ठेकेदाराने मान्य करून संबंधित बसस्थानकाला चोराडे फाटा नाव दिले आहे.
फोटो ओळ
२४पुसेसावळी
विटा-महाबळेश्वर रस्त्यावरील स्टँडचे चुकीचे नाव असलेला फलक काढून त्या ठिकाणी चोराडे फाटा असे नामकरण करण्यात आले आहे. (छाया : राजीव पिसाळ)