पेट्री : सातारा - कास मार्गावरील यवतेश्वर घाटात सांबरवाडी फाट्यापासून काही अंतरावर साताऱ्याकडे येताना बुधवारी सायंकाळी रस्त्याची डावी बाजू साधारण पाच-सहा मीटरपर्यंत भेगाळल्याने संबंधित विभागाकडून वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी धोक्याची पट्टी बांधण्यात आली होती. गुरुवारी ‘यवतेश्वर घाटातील रस्ता भेगाळला’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच या वृत्ताची दखल घेऊन बांधकाम विभागाकडून शनिवारपासून याठिकाणी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केल्याने ग्रामस्थ, पर्यटक, वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यवतेश्वर घाटात सांबरवाडीहून साताऱ्याकडे येताना बुधवारी सायंकाळी रस्त्याची डावी बाजू साधारणत: पाच-सहा मीटर लांबीपर्यंत भेगाळल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. पावसाचे दिवस असले तरी सध्या थोडीफार पावसाने उघडीप दिली असली तरी काही दिवसात पाऊस सुरू होऊन आणखी रस्ता खचण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. परिसरात काही दिवसांपूर्वी झालेला मुसळधार पाऊस, त्यात जड मालाची सतत वाहतूक यामुळे रस्ता भेगाळल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने मार्गावरील वाहतूक रामभरोसे झाली होती.
शहराच्या पश्चिमेला नागरिक, पर्यटक, वाहनचालकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असल्याने एखादी विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ, पर्यटक, वाहनचालकांतून होत होती. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने याठिकाणी बाजूने धोक्याची पट्टी लावण्यात आली असली तरी भविष्यात होणारा अनर्थ टाळण्यासाठी तत्काळ या ठिकाणची दुरूस्ती होऊन उपाययोजना होणे आवश्यक असल्याची मागणी होत असताना ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच बातमीची दखल घेऊन शनिवारपासून युद्धपातळीवर काम सुरू झाले.
बुधवारी रस्ता भेगाळून नजीकची जुनी संरक्षक भिंत फुगल्याने पावसामुळे रस्ता खचून भिंत कोसळण्याची शक्यता होती. यामुळे सध्या ही जुनी संरक्षक भिंत जेसीबीने हटवून साधारण वीस मीटर लांब व चार मीटर उंच संरक्षक भिंत नव्याने बांधण्याचे काम सुरू आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
(चौकट)
दुसऱ्या बाजूला कठड्यांची दुरवस्था...
रस्त्याच्या एका बाजूला पावसाळ्यात कोसळणारी दरड तर दुसऱ्या बाजूला संरक्षक कठड्यांची दुरवस्था त्यात रस्त्याच्या भेगेचे संकट, यामुळे घाट धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये यवतेश्वर घाटातील रस्ता खचून वाहतूक ठप्प होऊन काहीकाळ एकेरी वाहतूक सुरू होती.
०३पेट्री
यवतेश्वर घाटात बांधकाम विभागाकडून शनिवारपासून रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केल्याने पर्यटक, वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे. (छाया : सागर चव्हाण)