कोळकी : विडणीमध्ये दहाबिघे येथे कोविडची रॅपिड टेस्ट शिबिरात ३१ जणांंचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
विडणी येथील हॉटस्पाॅट असलेले दहाबिघे येथे कोविडची रॅपिड टेस्ट शिबिर विडणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांच्या मार्फत जिल्हा परिषद शाळा दहाबिघे येथे
घेण्यात आले. यावेळी शिबिरात एकूण १५० लोकांच्या रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये एकूण ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले
आहेत. हॉटस्पाॅट असलेले दहाबिघेमधील पहिले कोरोना बाधित असलेले
व्यक्तीच्या संपर्कातील हायरिस्क, लो रिस्क व वयोवृद्ध तसेच काहींना
प्राथमिक लक्षणे जाणवत होती अशा सर्व लोकांची तपासणी केल्यानंतर ३१
जणांंचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
विडणी प्राथमिक
आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी नयन शेंडे, आरोग्य कर्मचारी बंडू
सुतार, विडणीतील सर्व आशासेविका, दहाबिघे अंगणवाडी ताई यांचे या
शिबिरामध्ये मोलाचे योगदान लाभले. विडणी ग्रामपंचायतचे सरपंच रुपाली अभंग, पोलीस पाटील धनाजी नेरकर यांच्या विशेष प्रयत्नातून हे शिबिर राबवले आहे. या शिबिरामुळे ज्यांना लक्षणे नाहीत; पण अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यांना वेळीच
उपचार सुरू करता येतील व पुढील त्रास कमी होईल. तसेच या शिबिरात पॉझिटिव्ह रुग्णाला वैद्यकीय अधिकारी डॉ. नयन शेंडे यांनी मार्गदर्शन करून प्राथमिक
उपचार म्हणून गोळ्याचे वाटप करण्यात आले आहे. जे लोक पॉझिटिव्ह आहेत व
लक्षणे नाहीत त्यांनी घाबरून न जाता घरीच आयसोलेट होऊन उपचार करून घ्यावेत,असेही त्यांनी सांगितले.