सागर नावडकर ल्ल शेंद्रेनवीन वर्षात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेंद्रे गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. जिल्हा परिषदेच्या शेंद्रे गट हा सर्वसाधारणसाठी खुला झाल्यामुळे या गटात मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दहा वर्षांनंतर हा गट सर्वसाधारण पुरुषसाठी खुला झाल्याने दोन पंचवार्षिक पासून इच्छुक असणारे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत.शेंद्रे गटात ‘शेंद्रे गण’ व ‘दरे खुर्द’ गण आहेत. त्यातील शेंद्रे गण हा नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्रीसाठी राखीव झाला आहे. तर दरे खुर्द गण नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुषसाठी राखीव झाला आहे. शेंद्रे गटात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्या दोघांचेही गट प्रबळ आहेत. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत मनोमिलन तुटल्याने येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही दोन्ही राजेंच्या गटातच मुख्य लढत होणार आहे.शेंद्रे गटातील दोन्हीही पंचायत समितीचे गण आरक्षित झाल्याने जिल्हा परिषदेसाठी काट्याची टक्कर होणार आहे. तर पंचायत समितीसाठी उमेदवारीची शोधाशोध दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांची चालू आहे. जिल्हा परिषदेच्या शेंद्रे गटातील इच्छुकांची संख्या लक्षात घेता खासदार व आमदारांना उमेदवारी देताना मोठी डोकेदुखी होणार आहे. विस्ताराने मोठा असणाऱ्या शेंद्रे जिल्हा परिषद गटात शेंद्रे, बोरगाव, सोनगाव तर्फ सातारा, आसनगाव, जकातवाडी या गावातील मतदार संख्या जास्त असल्याने या गावातच खासदार व आमदार गटाची उमेदवारी जाण्याची शक्यता आहे. गटातील अनेक इच्छुक उमेदवार आत्तापासूनच जनसंपर्क वाढवून आहेत. तसेच आपल्याला गटातील लोकांचा मोठा पाठिंबा आहे. त्यांचे शक्तिप्रदर्शन करून उदयनराजे व शिवेंद्रराजे यांच्याकडे उमेदवारीची मागणी करत आहेत.शेंद्रे गटात आपणच उमेदवार निवडून आणायचा, असा चंगच खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांच्या बैठका व उमेदवार निवडीची चाचपणी सुरू केली आहे. शेंद्रे गटामध्ये अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना व अजिंक्यतारा सूतगिरणी असल्यामुळे या गटात शिवेंद्रराजे गट जास्त आक्रमक असलेला दिसून येत आहे. मनोमिलनामुळे जिल्हा परिषद दोन पंचवार्षिक निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजे गटाला उमेदवारी नव्हती. मनोमिलन तुटल्याने दोन्हीही गटांचे कार्यकर्ते खूश झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना आता सन्मानाची व आपुलकीची तसेच राजकीय संधी देण्याचा शब्द मिळू लागला आहे.शेंद्रे गट हा मागील दोन पंचवार्षिक पासून खासदार उदयनराजे गटाकडे असल्यामुळे या गटात आमदार गटाएवढीच खासदार गटाचीही ताकद आहे. त्यामुळे या गटात दोन्ही राजेंच्याच कार्यकर्त्यात मोठी लढत पाहायला मिळणार आहे.शेंद्रे गटात भाजप हा शिवसेनेचे अस्तित्व कमी असल्याने त्यांच्या उमेदवारीचा प्रभाव पडण्याची शक्यता कमी आहे. तसेच भाजपाच्या गोटात आता तरी शांतताच पाहायला मिळत आहे.शेंद्रे गटात खासदार गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, सातारा पंचायत समितीचे उपसभापती सूर्यकांत पडवळ यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. खासदार गटाकडून माजी उपसभापती सूर्यकांत पडवळ कोणती भूमिका घेणार, याविषयी गटात चर्चा सुरू आहे. मागील पंचायत समिती निवडणुकीत सूर्यकांत पडवळ बंडखोरी करून निवडून आले होते. तसेच यावेळी उदयनराजे भोसले जुन्या उमेदवारांना संधी न देता नवीनच चेहरा देतायत का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.शेंद्रे गटात आमदार शिवेंद्रराजे भोसले गटाची चाचपणी सुरू आहे. सातारा शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती अरविंद चव्हाण, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक मोरे, संतोष कदम हे प्रमुख दावेदार आहेत. पण आमदार गटातही इच्छुकांची संख्या जास्त असल्याने आमदार शिवेंद्रराजे यांच्यापुढे ही उमेदवारी निवडताना मोठी कसरत करावी लागणार आहे. युवकांच्या पाठिंब्याचा विचार करता शेंद्रे गटात विक्रम पवार यांची भूमिका निर्णायक ठरणारा आहे. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशा अनेक राजकीय घडामोडी पाहावयास मिळत आहेत. या गट आणि गणात अनेक दिग्गज व मातब्बरांची मोठी संख्या असल्यामुळे अनेकांची नाराजी सुरू करताना खासदार व आमदारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले जुन्याच लोकांना संधी देणार की नवीन चेहऱ्याला संधी देणार, याकडे गटातील सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेंद्रे झेडपी गटात दोन्ही राजेंमध्ये प्रतिष्ठेची लढाई..!
By admin | Published: January 01, 2017 10:45 PM