सातारा : आंतरजिल्हा बदली, प्राथमिक शिक्षक एनओसी मिळावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन (प्राथमिक शिक्षक) यांच्या वतीने सातारा जिल्हा संपर्क प्रमुख संदीप फणसे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हा परिषदेसमोर घंटानाद ठिय्या आंदोलन करण्यात आले.रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन व रोष्टर चळवळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील शिक्षक बदल्या, बढतीचे प्रकरण काही दिवसांपासून गाजत आहे. रोष्टर पूर्ण झाले नसल्याने बदल्या, बढती प्रक्रिया ठप्प झाली होती. काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदल्या प्रक्रिया सुरू केली होती; परंतु रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने यावर तीव्र आक्षेप घेऊन मागासवर्गीयांवर अन्याय होणार असल्याने ही प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली होती. यानंतर बदल्यांची प्रक्रिया थांबविण्यात आली. रोष्टर लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचे आदेश शिक्षण सभापती सतीश चव्हाण यांनी शिक्षण विभागाला दिले होते. जिल्हा परिषदेत या घडामोडी सुरू असतानाच रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन व रोष्टर चळवळीतर्फे सोमवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संवर्गातील अनुशेषाव्यतिरिक्त भरलेली पदे रद्द करावीत, रिक्त पदांवर प्राधान्याने आंतरजिल्हा बदलीने पात्र शिक्षकांना तत्काळ पदस्थापना देण्यात याव्यात, सातारा जिल्हा परिषदेमधून जाणाऱ्या उपशिक्षकांना त्वरित एनओसी देण्यात याव्यात, दि. ३१ मे २०१६ पर्यंतच्या उपशिक्षक जाती प्रवर्गनिहाय शाळा, तालुकानिहाय रिक्त पदांचा तपशील देण्यात यावा, जिल्हा परिषदेच्या रिक्त पदावर नेमणूक देताना, पदस्थापना करताना समुपदेशन (आॅनलाईन) कार्यपद्धतीने पसंतीनुसार शाळा देण्यात यावी, रोष्टर तत्काळ मंजूर करून घेण्यात यावे, अशा मागण्या केल्या आहेत. आंतरजिल्हा बदली दुर्धर आजार, पती-पत्नी एकत्रीकरण अट शिथिल, अपंग, एकतर्फी प्राथमिक शिक्षकांना गेली दहा वर्षांपासून सातारा जिल्ह्यात बदलीने येण्यासाठी वारंवार जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदन, प्रत्यक्ष भेटून चर्चा करीत आहे. मात्र वारंवार संच मान्यता, समायोजन, रोष्टर या बाबी सांगून जिल्हा परिषद प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही केला आहे. या आंदोलनामध्ये रोष्टर चळवळीचे संस्थापक अध्यक्ष संदीप फणसे, राजेंद्र सरक, रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गणेश दुबळे, सुनील कांबळे, शिवाजी भोसले, दत्तात्रय कोलवडकर, संतोष लंभाते, संतोष कोळेकर यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)हुश्शऽऽ याद्या सापडल्या!रोष्टरसाठी लागणाऱ्या याद्या गायब असल्याचे वास्तव पुढे आले. प्राथमिक विभागातील १९८३, ८८, ९४, ९५, २००४, २००९ या सालात नेमणुका झालेल्या शिक्षकांच्या याद्याच सापडत नव्हत्या. याची शोधाशोध सुरू करण्यात आली. प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्यासह २६ कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. मागील शनिवार, रविवारी सुटी असतानाही जिल्हा परिषदेत याद्यांची शोधाशोध सुरू होती. अखेर याद्या सापडल्याने शिक्षण विभागाचा जीवात-जीव आला.
‘रिपब्लिकन फेडरेशन’चा जिल्हा परिषदेसमोर घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2016 1:42 AM