म्हसवड : ‘माणदेश हा प्रतिकुल परिस्थितीचा भाग असून, या प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत या भागातील अनेक नवरत्नांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करून माणदेशाला मान मिळवून दिला आहे. ध्येयनिश्चित असेल तर यशाला गवसणी घालता येते, हे ललिता बाबरने सिद्ध करून दाखविले आहे. माणदेशचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून, तिने आॅलिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून देऊन माणदेशाचा झेंडा सातासमुद्रापार फडकवावा,’ असे प्रतिपादन कोकण विभागाचे विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांनी केले. येथील मेरीमाता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने आयोजित केलेल्या माणदेश गुणवंत खेळाडू सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयकर विभाग मुंबईचे सहआयुक्त नितीन वाघमोडे, महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालयाचे माणिकराव ठोसरे, जिल्हा परिषद व माध्यमिकचे शिक्षण अधिकारी देविदास कुलाळ, जिल्हा क्रीडाधिकारी उदय जोशी, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सरचिटणीस राजेंद्र दुखनकर, नगराध्यक्ष विजय धट, उपनगराध्यक्ष डॉ. वसंत मासाळ, प्राचार्य फादर वर्गीस अगस्ती महाराष्ट्र स्पीडबॉल असो.चे कार्याध्यक्ष विजयराज पिसे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, अनिल पाटील, माणदेश फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक माने, प्रवीण काळे, सुनील बाबर उपस्थित होते. यावेळी सत्रे म्हणाले, ‘दुष्काळी भागात गुणवत्तेची कमतरता नाही. येथील मुलांना गरज आहे योग्य संधी, मार्गदर्शन मिळण्याची. येथील व्यक्तीमध्ये कष्ट करण्याची तयारी आहे. म्हसवडसारख्या ग्रामीण भागात मेरीमाता इंग्लिश स्कूलने शिक्षणाचे रोपटे लावून आज वटवृक्षाकडे झेपावत असणाऱ्या संस्थेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष असल्यामुळे यापुढील काळात माणचा विद्यार्थी अनेक क्षेत्रांमध्ये चमकणार आहे.’ नितीन वाघमोडे म्हणाले, ‘माणदेशाचे नाव सातासमुद्रापार फडकवणाऱ्या व सर्व माणदेशाच्या नजरा आॅलिम्पिक स्पर्धेकडे लागल्या असून, या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून ललिता देशाला पदक मिळवून देणारच, तसेच तिच्या वाटचालीस लागेल ती मदत करावी.’ सत्काराला उत्तर देताना ललिता म्हणाली, ‘मी आजवर विविध स्पर्धांमध्ये यश मिळविले. यापुढे माझे ध्येय आॅलिम्पिक स्पर्धा असून, या स्पर्धेत निश्चितच पदक मिळवणार. आजचा सत्कार हा माझ्या माणदेशातील मातीने केला आहे. माझ्या या यशात माझे आई-वडील, काका व माझे गुरू यांचा मोलाचा वाटा आहे.’ यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्तर अमेरिका येथे होणाऱ्या शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या ओंकार पवार व सौरभ नवले यांचाही सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
ललितामुळे माणचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर !
By admin | Published: October 03, 2015 11:05 PM