लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : अव्वाच्या सव्वा व्याजाने महिलांना दिलेल्या मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या कर्जाच्या चक्रव्यूहातून पीडित माता-भगिनींना सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून यंत्रणेशी रितसर मार्गाने लढा देऊन आणि प्रसंगी कारावास भोगावा लागला तरी बेहतर मात्र संबंधित महिलांना कर्जमाफी मिळवून देणारच, असा ठाम निर्धार ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष श्री संदीप मोझर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कर्जमाफीसाठीचे अर्ज भरण्याची मोहिम संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या तडफेने सुरु असून इच्छूक महिलांनी ३० मे पूर्वी ‘मनसे’च्या पिरवाडी-सातारा येथील कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहनही मोझर यांनी केले आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अनेक मायक्रोफायनान्स कंपन्यांनी किरकोळ दराने उचललेले कर्ज २४ ते ३० टक्के व्याजदराने महिलांना वाटले असून कर्जवाटप, व्याजआकारणी, वसुली या सर्वच पातळीवर महिलांची मोठी फसवणूक होत आहे. त्यामुळे संबंधित पीडित महिलांनी एकत्रित येऊन ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला आहे. रणरागिणी एल्गार मेळावे, जाहीर मोर्चे, धरणे व ठिय्या आंदोलन, आमरण उपोषण आदी स्वरुपात हा लढा सुरु आहे. दि. ३ मे पासून संदीप मोझर यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाची दखल घेऊन रिझर्व्ह बँक व मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूट नेटवर्क या शासकीय यंत्रणेचे शिष्टमंडळ साताऱ्यात आले व निवासी जिल्हाधिकाऱ्याच्या दालनात झालेल्या बैठकीत कर्जमाफीच्या अनुषंगाने काही निर्णय झाले.यामध्ये मायक्रोफायनान्स कंपनीचे कोणीही प्रतिनिधी किंवा वसुली अधिकारी वसुलीसाठी कर्जदार महिलेच्या घरी जाऊ नये असे निश्चित करण्यात आले. तसेच आजवर फायनन्स कंपन्यांनी केलेल्या मनमानी व्याजआकारणी व वारेमाप लुटीचा मोबदला म्हणून लूटवापसी परतावा म्हणून मायक्रोफायनान्स कंपन्यांनी दिलेली सर्व कर्ज माफ करण्याच्या मागणीवर ज्या महिला अडीअडचणीमुळे कर्ज फेडू शकत नाहीत त्यांनी याबाबतचे लेखी अर्ज १ जूनपर्यंत शासकीय यंत्रणेकडे देण्याचे ठरले. त्या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेचे मायक्रोफायनान्स कंपन्याविरोधातील संपूर्ण भारतातील पहिले तक्रार निवारण केंद्र साताऱ्यात स्थापन्याचेही आश्वासन यावेळी रिझर्व्ह बँकेच्या शिष्टमंडळाने दिले. कर्जमाफीबाबतचे लेखी अर्ज भरुन घेण्याची मोहिम जिल्ह्यात ‘मनसे’तर्फे राबविण्यात येत आहे.ज्या महिलांनी अजून हे अर्ज भरले नाहीत त्यांना मनसेच्या पिरवाडी-ाातारा येथील कार्यालयात दिनांक ३० मे पूर्वी सकाळी ११ ते सायंकाळी ७ यावेळेत संपर्क साधून व प्रत्यक्ष येवून कर्जमाफी अर्ज भरावेत. सोबत आधारकार्डची झेरॉक्स, फोटो व कर्जमाफीशी सुसंगत कागदपत्रे, झेरॉक्स प्रतीमध्ये सादर करावेत. ही अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे नि:शुल्क असून इच्छूक महिलांनी कर्जमाफीबाबतचे अर्ज भरावेत, असे आवाहन संदीप मोझर यांनी केले आहे.गोरगरीब महिलांना छळणाऱ्या मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींना धडा शिकवू आणि पीडित माता-भगिनींची कर्जमाफी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा निर्धार यानिमित्ताने गावोगावी होणाऱ्या जनजागृती सभांमध्ये संदीप मोझर यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्यासमवेत या ठिकठिकाणच्या सभामध्ये दिलीप सुर्वे, मधुकर जाधव, सचिन पवार, कुमार जाधव, रामदास वाघचौरे, विक्रम लावंड, मनिषा चव्हाण, स्वाती माने, अनिता गंगावणे, भारती शेंडे, अलका दगडे, आयेशा शेख, निर्मला राठोड आदींचा सहभाग आहे.
कर्ज चक्रव्यूहातून माता-भगिनींना सोडवणार
By admin | Published: May 24, 2017 11:13 PM