सातारा : ‘गेल्या साडेतीन वर्षांपासून सध्याचे सरकार केवळ सवंग लोकप्रियतेसाठी फक्त घोषणांचा पाऊस पाडत आहे. कोणताच ठोस निर्णय घेतला जात नाही. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यात चालढकल केली जात आहे. आरोग्य विभागातील रिक्त जागा भरल्या जात नाहीत. वृद्धापकाळात मिळणाऱ्या निवृत्तीवेतनात वाढ केली जात नाही. सरकारने घोषणा करण्यापेक्षा अंमलबजावणी करावी, अन्यथा जनता तुम्हाला विरोधी बाकावर बसवेल,’ असा इशारा आमदार जयकुमार गोरे यांनी दिला.
नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांविषयी विधिमंडळ सभागृहात ते बोलत होते. आमदार गोरे सभागृहात बोलताना पुढे म्हणाले, ‘सरकार आल्यावर १५ दिवसांत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणाºयांनी गेल्या साडेतीन वर्षांपासून त्याबाबतीत काहीच केले नाही. आरक्षण देण्याविषयी नेमलेली समिती दीड वर्षात अहवाल देणार होती. मात्र, साडेतीन वर्षे झाली तरी काहीच निर्णय घेण्यात आला नाही. धनगर समाजाने केलेल्या आंदोलनामुळे आरक्षण मिळाले नाही. मात्र, दोन मंत्रिपदे मिळाली.
धनगर समाजाला आरक्षण लवकर मिळावे, अन्यथा हाच समाज तुम्हाला विरोधी बाकावर बसवेल,’ असा इशाराही आमदार गोरे यांनी दिला.आमदार गोरे म्हणाले, ‘इतिहासात कधीच निघाले नव्हते असे विराट मोर्चे निघाले, लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला. मात्र आश्वासनाशिवाय या सरकारने काहीच दिले नाही. हे सरकार निर्दयी आहे. मागच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याची घेतलेली भूमिका चुकीची होती, असे सांगताना या सरकारने काय केले ते जनतेसमोर आले पाहिजे.’
गोरे म्हणाले, ‘या सरकारकडे राज्याच्या बजेटचे नियोजन नाही. सगळी अनागोंदी सुरू आहे. गेल्या साडेतीन वर्षांत या सरकारने दीड लाख कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात मांडल्या आहेत. राज्याच्या कर्जाचा बोजा पाच लाख कोटींवर गेला आहे.’सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस...गेल्या साडेतीन वर्षांपासून हे सरकार फक्त घोषणाच करत आहे. संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन वाढविण्याविषयी अनेक वेळा आवाज उठवला. मंत्र्यांनी त्याविषयी घोषणा केल्या. मात्र आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. सरकारने या योजनांद्वारे राज्यातील वृद्धांना दिलासा द्यावा, असेही आमदार गोरे यांनी सांगितले.