सातारा : तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव शुक्रवारी झालेल्या पंचायत समितीच्या सभेत करण्यात आला. धुमाळ यांच्याविरोधात लोकांच्या तक्रारी होत्या. तालुक्यातील शाळांची गुणवत्ता त्यांच्यामुळेच ढासळली असल्याचा आरोप या सभेत सदस्यांनी केला.सातारा पंचायत समितीची मासिक सभा सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झाली. या सभेत सदस्य राहुल शिंदे यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कारनाम्यांचा पाढाच वाचला. काम नीट करत नाहीत, शाळांची गुणवत्ता त्यांच्यामुळेच ढासळली आहे.
ध्वजनिधीचे पैसे सरकारी तिजोरीत भरण्याआधी अनेक दिवस त्यांनी स्वत: जवळ ठेवले, समायोजनाच्या कामात अनेकांकडून पैसे घेतल्याचे समोर आल्याचा आरोप शिंदे यांनी केला. अशा अधिकाऱ्यांला पाठीशी घालणे चुकीचे आहे, असे सदस्य संजय पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, धुमाळ यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला केल्या जातील, असे सभापती मिलिंद कदम यांनी सांगितले.सभेच्या सुरुवातीलाच कोडोली गणाचे सदस्य रामदास साळुंखे यांनी मागील सभेत महिला सदस्यांनी मांडलेला विषय घेतला नाही. उलट त्यांच्या गणात मागणी नसताना पिकअप शेडचे काम करण्यात आले, असा आरोप केला. त्यावर उपसभापती जितेंद्र सावंत यांनी तालुक्यात कामे सूचवायचा सर्व अधिकार हा सभापतींना आहे.
ज्या ठिकाणी कामाची मागणी आहे, त्या ठिकाणी ही कामे दिली गेली आहेत. तसेच मागील बैठकीत प्रोसिडिंगला मान्यता दिली गेली आहे. आता त्याचा विषय संपला आहे. त्यावर तुम्हाला बाहेर जाताना हा विषय सांगितला होता, असे महिला सदस्याने सभापतींना सांगितले. तुम्ही कामाची लेखी मागणी केलेली नाही. त्यानंतर आता सभेत विषय मांडताय, मागील सभेत तुम्ही याबाबत बोलला नव्हता. आता विषय घेता येईल, असे सभापती कदम यांनी स्पष्ट केले.यानंतर विविध खात्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी एसटी, सार्वजनिक बांधकाम, सामाजिक वनीकरण, विद्युत विभाग ग्रामीणचे अधिकारी गैरहजर राहिल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे अधिकारी सभेत हजर राहणार नसतील, तर तालुक्यांतील समस्या सोडवणार कशा?
संबंधित खात्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. दरम्यान या सभेत तालुक्यातील स्वाईन फ्लूने मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या दुखवट्याचा ठराव घेण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेला स्वच्छतेच्या बाबतीत देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याने अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला.
कदम-पाटील यांच्यात शाब्दिक चकमकसभापती महिला सदस्यांवर अन्याय करू नका, गणांमध्ये गटारांची अवस्था दयनीय आहे. महिला सदस्यांनी गटाराची मागणी केली होती, असा आरोप संजय पाटील यांनी केला. त्यावर मिलिंद कदम यांनी ह्यसभागृहाची दिशाभूल करू नका, संबंधित महिला सदस्यांनी रस्त्याचा विषय जाता-जाता सांगितला होता. त्यांचा विषय पुढील सभेत घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. यावेळी दोघांत शाब्दिक चकमक उडाली.सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांवर जाळसार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी या सभेत हजर राहिले नव्हते. कनिष्ठ अधिकारी पाठवून आढावा घेण्यात येणार असल्याचे लक्षात आल्यानंतर राहुल शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांला खाली बसवले. तुम्ही आढावा देण्याची गरज नाही. शाखा अभियंत्याने या सभेला उपस्थित राहायला पाहिजे, पुढील सभेपासून त्यांना पाठवा, संबंधित खात्याला सभापतींनी नोटीस काढावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.