गुढे (ता. पाटण) येथे सकल मराठा मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी अॅड. भरत पाटील, दत्तात्रय सुर्वे-पाटील, महादेव पाटील, राजाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
नरेंद्र पाटील म्हणाले, सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू असून, मराठा नेतेच मराठ्यांच्या बाजूने उभे राहताना दिसत नाहीत. आम्ही सत्तेसाठी लाचारी न पत्करता मराठा समाजाच्या भवितव्यासाठी लढत आहोत. ‘ऊठ मराठा, जागा हो’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. काहीजणांकडून ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी तरी समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे.
अॅड. भरत पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाचा लढा हा खऱ्या अर्थाने १९८२ साली दिवंगत अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केला. मराठ्यांना न्याय दिला नाही, तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही, असा अण्णासाहेबांचा निर्धार होता. या निर्धाराने त्यांनी मराठा समाजासाठी बलिदान दिले.
दीपक तडाके यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानदेव वायचळ यांनी प्रास्ताविक केले. दत्तात्रय सुर्वे-पाटील यांनी आभार मानले.