सातारा : येत्या काही दिवसांत येऊ घातलेल्या सातारा जिल्हा पोलीस भरतीत जागा वाढवून मिळाव्यात तसेच एसईबीसी प्रवर्गासाठी पोलीस भरतीमध्ये आरक्षण ठेवावे, अशी मागणी उदयराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, गृहविभागाच्या शासकीय आकडेवारीनुसार राज्यामध्ये ७५०० पेक्षा जास्त पोलीस शिपाई पदाच्या जागा रिक्त असताना फक्त ३३५७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या भरतीसाठी मुलांमधून स्पर्धा तीव्र होणार आहे. तसेच या जाहिरातीमध्ये एसईबीसी प्रवर्गासाठी कोणतेही आरक्षण दर्शविण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रवर्गातील युवकांवर अन्याय होणार आहे.
पोलीस भरतीसाठी ग्रामीण भागातील युवक गेल्या काही महिन्यांपासून मेहनत करत आहेत. ग्रामीण भागातील बहुतांश उमेदवार एसईबीसी प्रवर्गातील आहेत. या बाबीचा शासनाने विचार करून पोलीस शिपाई भरती २०१९ ची प्रक्रिया एकूण सुमारे १२०० जागांसाठी सुरू करावी. तसेच या भरतीबाबत न्याय हक्काचे एसईबीसी प्रवर्गातील १३ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात याव्यात, यासाठी योग्य ती दुरूस्ती करण्यात यावी.