फलटण : सध्या सातारा जिल्ह्यामध्ये कोविड १९ म्हणजे कोरोना संसर्गाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फलटण नगरपालिकेचे सफाई कर्मचारी तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना या काळात कोरोना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करावे लागत आहे. या काळात कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फलटण शहरातील उपलब्ध कोविड सेंटरमध्ये दहा बेड राखीव ठेवण्यात याव्यात किंवा स्वतंत्र कोविड सेंटरची स्थापना करावी, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, फलटण शहरच्यावतीने फलटण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कोविड सेंटरमध्ये दहा टक्के बेड राखीव ठेवतानाच संपूर्ण खर्च मोफत व्हावा. त्याचबरोबर नुकताच आमचे कर्मचारी कोरोना योद्धा संदेश चव्हाण यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले आहे. त्यांच्या वारसाना तत्काळ कामावर रुजू करून घ्यावे व त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी. निवेदन देतेवेळी राजू मारुडा, स्वच्छता निरीक्षक पी. के. तुळसे, अध्यक्ष मनोज मारुडा, उपाध्यक्ष रमेश वाघेला, संजय निकाळजे, सूरज मारुडा, टेबरे आदी मान्यवर उपस्थित होते. नगरपालिकेच्यावतीने फलटण नगरपालिकेचे सचिव तथा कार्यालयीन अधीक्षक मुस्ताक महात यांनी निवेदन स्वीकारले.