सातारा : कोरोनाचा शिरकाव हा प्रामुख्याने एकमेकांच्या संपर्कात आल्याने होतो. त्यामुळे राज्य शासनाने सर्वप्रथम सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. रेल्वे तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत असतो. यासाठी डेमू (पॅसेंजर) गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आरक्षित गाड्यांमध्ये कोठेही सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी केली जात नाही.
रेल्वे हे दूरच्या प्रवासासाठी सर्वांत सुलभ आणि कमी खर्चात होणारे माध्यम आहे. त्यामुळे याला साताऱ्यात नसले तरी इतर जिल्ह्यांतून चांगला प्रतिसाद मिळतो. रेल्वेच्या डेमू गाड्यांमध्ये मरणाची गर्दी असते. त्यामुळे तेथे सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन कसे होणार हा प्रश्नच होता. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने गेल्या दीड वर्षांपासून त्या बंद केल्या आहेत. एक्स्प्रेस गाड्यांना असलेले जनरलचे चार डबेही काढले आहेत. त्यामुळे आगाऊ आरक्षण करणाऱ्यांनाच प्रवास करता येतो. मात्र, यामध्येही कसेही नियमांचे पालन केले जात नाही. गाड्यांमधील सर्वच आसनांवर प्रवासी एकमेकांना चिटकून बसलेले असतात.
चौकट :
विक्रेत्यांची गर्दी
रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी रोडावली असल्याने अनेक लहानमोठ्या व्यावसायिकांवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांत किरकोळ विक्रेते दिसत नसले तरी डब्यांमध्ये चालू रेल्वेत भेळ, काकडी, फळे, पेन, डायऱ्या विकणारे फिरत असतात. त्यामुळेही कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चौकट
सर्व गाड्यांची स्थिती सारखीच
१. रेल्वेचे आसन आरक्षण हे आगाऊ करावे लागते. त्यासाठी एकतर खिडकीवर जाणे किंवा रेल्वे मंत्रालयाने ऑनलाईन ॲप आणले आहेत. त्यावर जाऊन आरक्षण करता येते.
२. आरक्षण नोंदविताना एका नंबर नंतर दुसरे आसन ब्लॉक केलेले असणे अपेक्षित आहे. मात्र, तसे काहीही केलेले दिसत नाही. सरसकट आरक्षण नोंदविले जातात. त्यामुळे सर्व आसनांवर प्रवासी बसलेले असतात.
३. ही अवस्था बहुतांश सर्वच गाड्यांमध्ये आहे. केवळ काही गाड्यांमध्ये आरक्षण पूर्ण क्षमतेने झालेले नसल्यास प्रवासी अंतर ठेवून बसतात.
कोट
प्रशासनाने नियमांचे पालन करावे
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी झालेला नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने एकाआड एक आरक्षण बुकिंग होईल असे नियोजन करावे. सणाच्या दिवसांत गर्दी वाढणार असेल तर डब्यांची संख्या वाढविण्यास हरकत नाही. मात्र, कोरोना रोखण्यासाठी काळजी घ्यायलाच हवी.
- अक्षय जाधव,
सातारा.
फोटो
१८रेल्वे
लोणंद रेल्वे स्थानकात आलेल्या रेल्वेतील सर्वच आसनांवर प्रवासी बसलेले होते. (छाया : संतोष खरात)