सातारा : सह्याद्री देवराई फाऊंडेशनच्यावतीने पंचगव्य व माती या नैसर्गिक घटकांचा समावेश असणाऱ्या गोमय गणेशाची निर्मिती ज्येष्ठ शिल्पतज्ज्ञ किशोर ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारली आहे. लिंब येथील पोलीस कवायत मैदानावर या श्रीगणेशाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष अभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सयाजी शिंदे म्हणाले, गणरायाची पवित्रता घेऊन नव्या संकल्पनांसह आम्ही आलो आहोत. देवराईत २१ झाडांचे वृक्षारोपण करून श्री मंत्र म्हणावा व गणेशबाग करावी. २१ वेळा ओम गणेशाय नम: मंत्र जपावा. याच माध्यमातून आपल्या शरीरामध्ये एक सकारात्मक ऊर्जाही यानिमित्ताने येणार आहे. त्यानंतर या गणरायाचे जिथे विसर्जन होईल तिथे झाड लावावे. पर्यावरण संरक्षणासह श्री पूजनाची सकारात्मक ऊर्जा जपणे ही गोमय गणेश स्थापनेची मूळ संकल्पना असल्याचे सयाजी शिंदे व किशोर ठाकूर यांनी सांगितले.
अभय फडतरे पुढे म्हणाले, पुढीलवर्षी पूर्ण गावेच्या गावे अशा गणेश मूर्ती करणार आहेत. यावर्षी साडेसातशे गणेशमूर्ती केल्या आहेत त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या कराव्यात. किशोर ठाकूर म्हणाले, हा गणपती देवराईसाठी विशेष बनवला आहे. हा गणपती ऋषीप्रमाणे ध्यानस्थ बसला आहे. यामध्ये तिसरा डोळा हा ज्ञानाचा आहे. घरात देव आल्यानंतर ते जाणवत राहणार आहे. या गणेशाच्या पाठीमागे झाड आहे. त्याचीही पूजा होणार आहे. गणेशोत्सवानंतर त्याचे विसर्जनानंतर याचे रोपटं लावलं जाणार आहे. या रोपट्याच्या सुगंधाने धार्मिकता वाढीस मदत होणार आहे.
चौकट..
साडेसातशे गणेशमूर्तींची निर्मिती...
राज्यपातळीवर देवराई संकल्पना गणरायाच्या माध्यमातून रुजविणे हे फाऊंडेशनचे मूळ उद्दिष्ट आहे. आमचे सहकारी अभय फडतरे यांनी गोमातेच्या शेणापासून गणेशमूर्ती बनवली आहे. यावर्षी साडेसातशे गणेशमूर्ती बनविण्यात आल्या आहेत. या मूर्तीमध्ये माती, काऊ, देशी गाईचे शेण, चिंचेची पावडर या नैसर्गिक घटकांचा समावेश करण्यात आला आहे.