पुसेगाव : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विविध कार्यकारी सोसायटीचे मतदानासाठी ठराव होऊ लागले आहेत. नेर येथील विकास सेवा सोसायटीचे काही संचालक व सचिव नितीन देशमुख यांनी संगनमताने जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मतदान ठराव बेकायदेशीर केला आहे. सदरचा मतदान ठराव रद्द करून नव्याने ठराव करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे नेर विकास सेवा सोसायटीच्या सहा संचालकांनी केली.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नेर विकास सेवा सोसायटीत तेरा संचालकांपैकी एक मृत तर दोन अपात्र असल्याने सध्या दहा संचालक कार्यरत आहेत. जिल्हा बँकेसाठी मतदान ठराव करण्यापूर्वी नेर विकास सेवा सोसायटीचे सचिव नितीन देशमुख यांनी संचालक मंडळाला नोटीस काढून ३० जानेवारीला बैठक घेतली. या मीटिंगसाठी कार्यरत असणार्या दहा संचालकांपैकी केवळ चार संचालक उपस्थित होते. त्यामुळे सदरची मीटिंग कोरमअभावी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे संबंधित ठराव रद्द करण्यात यावा.