नितीन काळेल
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा परिषदेचा २०२१-२२ चा अर्थसंकल्प बुधवारी जाहीर होणार असून, कोरोनाच्या संकटामुळे काही विभागांच्या निधीला कात्री लागणार असून, यावेळीही शिक्षण आणि बांधकामला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गतवर्षी ४५ कोटींचा मूळ अर्थसंकल्प होता. यंदा ४ ते ५ कोटींनी कमी असण्याची माहितीही मिळत आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभाग आहेत. दरवर्षी मार्च महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर होत असल्याने सर्व विभागांना निधीची तरतूद करताना खूप विचार करावा लागणार आहे. बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली अर्थ व शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे हे अर्थसंकल्प सादर करतील.
मागीलवर्षी जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्नाचे ४४ कोटी ९९ लाख ५० हजारांचे मूळ अंदाजपत्रक होते. यामध्ये शिक्षण, बांधकाम आणि समाजकल्याण विभागाला अधिक रक्कम प्रस्तावित करण्यात आली होती. गेल्यावर्षीचा अर्थसंकल्प ५० हजार रुपये शिलकीचा होता. तसेच गेल्यावर्षी नवीन काही योजनाही सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात नवीन काही योजना असणार नाहीत, अशी माहिती मिळत आहे.
कोरोनामुळे अर्थकारण गडगडलं आहे. त्यामुळे कामांसाठी निधीची चणचण सर्वत्रच आहे. अशातच जिल्हा परिषद बुधवारी अर्थसंकल्प सादर करणार आहे. पण, कोरोनामुळे किती रकमेचा अर्थसंकल्प सादर होणार, याकडे अधिकाऱ्यांसह सदस्यांचेही लक्ष लागून राहिलेले आहे. कारण, मागीलवेळी शिक्षण, बांधकाम आणि समाजकल्याण विभागात अधिक निधीची तरतूद होती. यंदा मात्र, सर्वच विभागांना निधी देताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे कोणत्या विभागाला किती निधी मिळतो, याकडे लक्ष आहे.
त्यातच गतवर्षीपेक्षा यंदाचा अर्थसंकल्प कमी रकमेचा असणार आहे, अशी माहिती मिळत आहे. त्यातच शिक्षण आणि बांधकामसारख्या महत्त्वाच्या विभागांना इतरांपेक्षा चांगली तरतूद होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तरीही बुधवारी पेटारा उघडल्यानंतरच कोणत्या विभागाला झुकते माप मिळाले, हे स्पष्ट होणार आहे.
चौकट :
सभा वादळी ठरणार....
जिल्हा परिषदेच्या मागील काही सर्वसाधारण सभा पाहिल्या, तर गोंधळातच पार पडलेल्या आहेत. आरोप-प्रत्यारोप होणारच आहेत. पण, यावेळी काही अधिकाऱ्यांवर ही सभा नक्कीच गाजण्याची शक्यता आहे. त्याची पूर्वतयारी काही सदस्यांनी करूनच ठेवली आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सभा नक्कीच वादळी ठरू शकते.
.........................................................................