खंडाळा : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या नव्याने आलेल्या बदली धोरणामुळे खंडाळा तालुक्यातील अनेक शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. त्यातच या शैक्षणिक वर्षातील अर्धा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बदली प्रक्रिया राबत असल्यामुळे प्रत्येक शाळेचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
आपल्या पाल्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांच्या बदली विरोधात जनक्षोभ उसळला असून, खंडाळा तालुक्यातील गावोगावच्या ग्रामसभेत या वर्षात बदल्या करू नयेत, असे ठराव घेण्यात आले आहेत.
नव्या निकषावरून होणाºया शिक्षक बदल्या विरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या. याचा परिणाम जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीवरही होण्याची शक्यता आहे. आपल्या शाळेतील शिक्षकांची बदली होणार असल्याचे समजल्याने पालकवर्ग चिंतेत आहे. तर ज्या शिक्षकांची बदली होणार आहे त्यांच्या मुलांच्या पुढील निम्म्या वर्षाच्या शिक्षणाची अडचणही निर्माण होणार असल्याने तेही हवालदिल आहेत.
वास्तविक नवीन शैक्षणिक धोरणानुसार वर्षभर मुलांचे मूल्यमापन करून त्याच्या प्रगतीच्या नोंदी करावयाच्या असतात. त्यामुळे जून महिन्यापासून आत्तापर्यंत लहान मुलांना ज्या शिक्षकांच्या अध्यापनाची सवय आहे तेच बदलत असल्याने पालकही अस्वस्थ आहेत. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील गावोगावी ग्रामस्थांनीच आपल्या मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांची बदली करू नये, असे ठराव ग्रामसभेतून घेतले आहेत. शिक्षकांवर होणाºया अन्यायाविरोधात संघटनांनी पुढाकार घेतला असताना सर्वसामान्य पालकवर्गातून जनक्षोभ उसळल्याने आता शासन यावर काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आमच्या गावातील शाळेचे कामकाज चांगल्या रीतीने चालू आहे. शाळा प्रगतीपथावर असताना आणि निम्मे शैक्षणिक वर्ष संपले असताना मध्येच शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याने यात मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शासनाने पालकांच्या भावना विचारात घेऊन यावर्षी बदली प्रक्रिया थांबवावी. ग्रामसभेतून लोकांच्या याच भावना उमटल्या आहेत.- स्वाती माळी,सरपंच, म्हावशी