सातारा : जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील रस्ते आणि पथदिवे सुस्थितीत करावेत, अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक झाली. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, उद्योगांचे मालक, प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
अतिरिक्त जिल्हाधिकारी गलांडे म्हणाले, रस्ते व पथदिव्यांची समस्या जिल्ह्यातील सर्वच औद्योगिक क्षेत्रांमध्ये आहे. राष्ट्रीय महामार्ग व औद्योगिक विकास महामंडळामधील जागेचा वाद ८ दिवसांच्या आत सोडवावा. सातारा एमआयडीसी क्षेत्रातील कचऱ्याच्या प्रश्नाबाबत ग्रामपंचायत व एमआयडीसीने समन्वयाने मार्ग काढावा. कराड औद्योगिक क्षेत्रामध्ये जूनपर्यंत बससेवा सुरू करावी.
सातारा औद्योगिक क्षेत्रातील विनावापर भूखंड लिलावात काढण्यासाठीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा संबंधितांनी करावा. सातारा औद्योगिक वसाहतीस पाण्याच्या पुरवठ्यासाठी कृष्णा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या प्रस्तावाचे काम ८ दिवसांत मार्गी लावावे. महावितरणने कोरेगाव औद्योगिक क्षेत्रातील डीपीचा प्रश्न मार्गी लावावा. याविषयी असलेली योजना जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करावे. औद्योगिक परिसरातील ड्रेनेजच्या प्रश्नाबाबत स्थळपहाणी करून तो मार्गी लावावा.
या औद्योगिक वसाहतीमध्ये स्पीडब्रेकर उभारण्याचे काम दोन महिन्यांत पूर्ण करावे. औद्योगिक क्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. परिसराच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र संस्थेची नेमणूक करावी. कराड-रहिमतपूर रस्त्यावर अर्धवट असलेले काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.