याबाबत सरपंच संदीप जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरी व दुर्गम विभागातील सणबूर व त्याखालील वाड्या-वस्त्या सळवे प्राथमिक आरोग्य केंद्राखाली येतात. सात हजारावर लोकसंख्या असलेल्या सणबूर व परिसरातील आणि वाल्मीक पठारावरील जनतेची सणबूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे, अशी मागणी होती. ढेबेवाडी येथे ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित झाल्यावर ढेबेवाडी आरोग्य केंद्राची गरज उरली नाही. त्यामुळे ते केंद्र अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी वाल्मीक पठारावरील व सणबूर परिसरातील जनतेची मागणी व गरज लक्षात घेऊन ढेबेवाडीचे आरोग्य केंद्र सणबूरला स्थलांतरित व्हावे, यासाठी प्रयत्न करुन मंजुरी मिळविली. त्यानंतर हे केंद्र सुरू झाले. अपुऱ्या जागेमुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. इमारत बांधकामाची नितांत गरज निर्माण झाली होती. मात्र, जागा व निधीची समस्या होती. यासाठी खासदार श्रीनिवास पाटील, माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्या प्रयत्नातून इमारतीसाठी जिल्हा नियोजन मंडळातून एक कोटीचा निधी उपलब्ध झाला.
निधी उपलब्ध झाला तरी इमारतीसाठी जागेची समस्या होती. त्यासाठी ग्रामपंचायत तसेच तत्कालीन सभापती उज्वला जाधव यांनी सुचविलेली जागा अंतिम व्हावी, यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रयत्न केले. अखेर ४० गुंठे जागा मंजूर झाली असून त्या जागेचा जमीन हस्तांरण आदेश तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयातील जमीन हस्तांरण विभागप्रमुख बैलकर यांनी खासदार श्रीनिवास पाटील व सरपंच संदीप जाधव यांच्याकडे सुपूर्द केला. त्यामुळे इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
- चौकट
अनेक वर्षांचा पाठपुरावा
सणबूरला प्राथमिक आरोग्य केंद्र होण्यासाठी जागा सुचविणे, निधी उपलब्ध करणे यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. सरपंच संदीप जाधव, ग्रामसेवक अनिल कांबळे, माजी सरपंच सचिन जाधव, उत्तमराव जाधव, विशाल जाधव आदींनी त्यासाठी परिश्रम घेतले. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे.