आदर्की : फलटण पश्चिम भागातील आदर्की परिसरात कोरोना रुग्ण वाढीस प्रशासन जबाबदार असून, जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडऊन जाहीर केले असले तरी गावोगावी किराणा दुकानांसह सर्व आस्थापनांचे शटरडाऊन अन् खिडकी ओपन ठेवून वेळेचे बंधन न पाळता दुकाने सुरू ठेवल्याने कोरोनाबांधितांची संख्या वाढत असल्याने सर्वसामान्यांमधून चिंता व्यक्त होत आहे.
फलटण पश्चिम भागातील आदर्की महसुली मंडलातील तेरा गावांतील अर्धी गावे बफर झोनमध्ये
असूनही त्या ठिकाणी चढ्या भावाने सर्व मालाची विक्री सुरू आहे. प्रांतांच्या आदेशानुसार दूध व भाजीपाला विक्रीसाठी दोन ते तीन तासांचा वेळ दिला
आहे. त्याप्रमाणे बाकी गावात किराणा, चिकन, अंडी, दूध विक्रीसाठी सकाळी सात ते सकाळी अकरापर्यंत वेळ देऊनही अनेक किराणा दुकाने पूर्ण दिवस सुरू असतात. काही दुकानांतून शटर डाऊन ठेवून खिडकीतून सर्व मालांची विक्री सुरू आहे. त्यासाठी काही दुकानदारांनी लॉकडाऊनमध्ये खिडक्या, चोर दरवाजे तयार केल्याचे चित्र दिसत आहे.
स्थानिक प्रशासनाचे दुकानदारांचे संबंध असल्याने
कारवाई होत नाही, तर प्रशासकीय ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, वन शिपाई बैठकीपुरते येतात. त्यामुळे कारवाई नाही, किराणा दुकानांबरोबर सर्व आस्थापना चोरी-चोरी छुपके-छुपके सुरू असल्याने आदर्की महसुली मंडळात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.
(चौकट )
ग्रामीणमध्ये व्यापारी दुकानदार सुसाट
प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी शहरात उपाययोजना करण्यात गुंतल्याने
ग्रामीण भागात दुकानदार, व्यापारी सुसाट धावत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याची चर्चा सुरू आहे.