कराड (सातारा) : मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणा देत कराड येथील दत्त चौकात मराठा समाज बांधवांच्यावतीने गुरूवारी उंटावरून साखर वाटण्यात आली. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करुन पुष्पहारही घालण्यात आला. यावेळी अनिल घराळ, उदय थोरात, संदीप साळुंखे, विवेक कुराडे, अभय चव्हाण, शिवाजी चव्हाण, दत्ता पाटील, मोहन कदम, हेमंत पवार, वैभव पाटील, सुरेश डुबल, अमर कदम आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा समाजीची गेल्या कित्येक वर्षांची मागणी, राज्यभरात निघालेले मूक मोर्चे आणि नंतर मराठा मोर्चांना लागलेलं हिंसक वळण या घटनांची गंभीर दखल घेत शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आले. राज्य सरकारने 30 नोव्हेंबर 2018 रोजी यासंदर्भातील कायदा मंजूर केला होता. या आरक्षणाला आक्षेप घेत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला. न्यायलयाने मराठा समाजाचे शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण वैध ठरवले आहे. राज्य सरकारला कायदा बनविण्याचा अधिकार असल्याचे सांगत न्यायालयाने हे आरक्षण लागू कायदेशीर असल्याचं म्हटलं. मात्र, मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देता येणार नाही, तर हे आरक्षण 12 आणि 13 टक्के असेल, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. मराठा समाजाने आपल्या न्याय, हक्कासाठी लढा उभारला. मराठा आरक्षणासाठी भव्य मुकमोर्चे काढले. अनेक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर आज मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाने मोहर उठविल्याने मराठा समाजातील नव्या पिढीच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. हे आरक्षण मिळण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली. त्या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो.
अनिल घराळकामगार नेते, स्वाभिमानी संघटना