शिवथर : सातारा तालुक्यातील शिवथर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीमार्फत कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ३०० जणांना लसीकरण करण्यात आले.
शासनातर्फे ४५ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर शिवथर येथील ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यामार्फत लोकांची नावनोंदणी करून टोकन पद्धतीने ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये लसीकरण करण्यात आले. सकाळपासून नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी नंबरवरून वादावादी झाल्याचेही पहावयास मिळाले. ग्रामपंचायतीच्या ध्वनिक्षेपकावरून ग्रामस्थांना अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्याकडून लोकांना घरोघरी जाऊन लसीकरणाची माहिती देण्यात येत आहे.
सरपंच रूपाली साबळे यांनी ग्रामपंचायतीमध्ये लसीकरणासाठी नावनोंदणी सुरू असल्याचेे सांगितले. ग्रामविकास अधिकारी रामचंद्र गोडसे, तलाठी विजय शिंगटे, विस्ताराधिकारी दळवी तसेच ग्रामपंचायत सदस्य महेश साबळे, नसीम इनामदार, प्रिया साबळे, आरोग्य अधिकारी डाॅ. सतीश राठोड, आरोग्य सेविका मुसळे, आरोग्य सेवक भाग्यवंत आदींनी लसीकरणात सहभाग घेतला.