रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील एका ग्रामसेवकावर वादग्रस्त ठिकाणाच्या ग्रामपंचायतीची अतिरिक्त जबाबदारी घेण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव टाकण्यात आला आहे. वरिष्ठांकडून होणाऱ्या कारवाईच्या भीतीमुळे जबाबदारी घेतलेला नवखा ग्रामसेवक दडपणाखाली वावरत आहे.
कोरेगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक ग्रामविकासाच्यादृष्टीने झोकून देऊन काम करत आहेत. अशा ग्रामसेवकांचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह शासनाकडून वेळोवेळी कौतुक केले गेले आहे. मात्र, कोरेगाव तालुक्यातील एका गावात दहा-बारा वर्षांपासून ग्रामसेवकच टिकत नाही. ग्रामपंचायतीची जबाबदारी घेईल त्या ग्रामसेवकावर शासनाकडून काही कालावधीतच निलंबनासह वेगवेगळ्या प्रकारची कारवाई होत आहे. काही वर्षांत संबंधित ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून काम करणाऱ्या एका ग्रामसेवकावर रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामात गैरव्यवहार, एलईडी बल्ब बसवणे कामांमध्ये गैरव्यवहार, नियम डावलून बँकेत व्यवहार करून शासकीय व आर्थिक अनियमितता आणल्याचे गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर त्या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याप्रमाणेच या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून काम करणाऱ्या इतर ग्रामसेवकांवर वेगवेगळ्या कारणांनी शासकीय कारवाई केली होती.
एखादा दुसरा ग्रामसेवक चुकीचं काम करतोय म्हणून निलंबित केला जात असेल तर काही अडचण नाही. मात्र, त्याच ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकावरच नेहमी कारवाई होत असेल तर यामध्ये नक्की भानगड काय, असा प्रश्न उपस्थित होतो. ग्रामसेवक चुकीचं काम करतोय का संबंधित गावाचा लोकप्रतिनिधी चुकीचं काम करतोय आणि त्याचा फटका ग्रामसेवकांना भोगावा लागतो याचा तपास होणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी कितीही दबाव टाकला तरी ग्रामसेवकांनी शासकीय चौकटीत राहूनच कुठल्याही कागदांवर सह्या करणे गरजेचे आहे. याबाबत दुमत असण्याचं कारणच नाही; परंतु आपली अमूक तमूक नेत्यांबरोबर ऊठबस असून ‘तुम्ही मी सांगेल तिथे डोळे झाकून सह्या करा. मी पाहून घेतो’ असे आश्वासन देऊन वेळप्रसंगी अंगाशी आले की ग्रामसेवकांना तोंडाला देणारे काही लोकप्रतिनिधी ग्रामसेवकांसाठी घातक ठरत आहेत. त्यामुळे अशा गावाच्या वादग्रस्त ग्रामसेवकपदाच्या खुर्चीवर बसण्यास कुठलाही ग्रामसेवक धजावत नाही. त्यामुळे नवख्या ग्रामसेवकाला बळीचा बकरा केला जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चौकट :
कारवाईच्या भीतीने सहा महिने रजा
एका ग्रामसेवकाने बळीचा बकरा केला जाईल, या भीतीपोटी सहा महिने रजा टाकून ग्रामपंचायतीमध्ये काम करण्यास टाळाटाळ केली होती. या संबंधित ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकाची खुर्ची जेवढी वादग्रस्त ठरली तेवढी वादग्रस्त खुर्ची तालुक्यामध्ये दुसरी कुठलीही ठरली नसेल अशी तालुक्यात चर्चा आहे.