परळी : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभ्यात असलेले नागेश्वर या ठिकाणी महाशिवरात्रीला भाविकांची गर्दी असते. यंदा मात्र कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे याठिकाणी जाण्यास वन्यजीव विभागाने बंदी घातली आहे. याबरोबरच चकदेव, वासोटा किल्ला या ठिकाणीही जाण्यास निर्बंध आहेत, अशी माहिती वन्यजीवचे वनक्षेत्रपाल बा. दि. हसबनीस यांनी दिली आहे.
वनपरिक्षेत्र वन्यजीव बामणोली कार्यालय, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांच्याकडून सर्व पर्यटक, भाविकांना आवाहन केले आहे की, बामणोली परिक्षेत्रांतर्गत चकदेव (चौकेश्वर), पर्वत (मल्लिकार्जुन) व वासोटा नागेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविक दर्शनासाठी येत असतात. परंतु सध्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार यात्रा, जत्रा इत्यादी धार्मिक कार्यक्रम बंद ठेवण्यात येणार आहेत. नागेश्वर येथे जाण्याचा मार्ग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून जात असल्याने, तसेच चकदेव, कोयना अभयारण्य क्षेत्रात समाविष्ट असल्याने आणि पर्वत हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात समाविष्ट असल्याने गुरुवार, दि. ११ रोजी बामणोली परिक्षेत्रातील वासोटा, चकदेव पर्वत या ठिकाणी जाण्याकरीता कार्यालयाकडून परवानगी दिली जाणार नाही. महाशिवरात्री दिवशी वासोटा, चकदेव, पर्वत या ठिकाणचे पर्यटन बंद राहील.