पाचगणी : ‘प्रति पंढरपूर करहर (ता. जावळी) येथील आषाढी वारी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा निर्बंधात असल्याने विठ्ठल भक्तांनी आपल्या घरी विठुरायाच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे पूजन करून आषाढी एकादशी साजरी करून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत हा सोहळा पार पाडावा,’ असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
करहर (ता. जावळी) येथील आगामी आषाढी एकादशीनिमित्त झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रांताधिकारी राजेश टोम्पे, उपविभागीय पोलीस अधिकारी जान्हवी खराडे, तहसीलदार राजेंद्र पोळ, सभापती जयश्री गिरी, मेढा पोलीस निरीक्षक जीवन माने, वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते, डॉ. अनंत वेलकर, सरपंच भाऊ यादव, मंडल अधिकारी विजय पाटणकर, ग्रामसेवक मंगेश शिंदे, ठाणे अंमलदार दत्तात्रय शिंदे तसेच गावोगावचे वारकरी उपस्थित होते.
वसंतराव मानकुमरे म्हणाले, ‘अगोदरच आपण या महामारीत हक्काची माणसं गमावली आहेत. त्याकरिता गर्दी न करता प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून आपली धार्मिक परंपरा जपूया आषाढी वारी पुन्हा येईल, माणसं पुन्हा मिळणार नाहीत. पांडुरंगावर श्रद्धा ठेवून उत्सव शांततेत पार पाडू.’
यावेळी प्रशासनाच्यावतीने आढावा बैठकीत प्रांताधिकारी राजेश टोम्पे व उपविभागीय पोलीस अधिकारी जान्हवी खराडे यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच वसंतराव मानकुमरे यांनी वारीसंदर्भात घेतली. भूमिका प्रशासनासाठी कौतुकास्पदच असल्याचे सांगितले.
यावेळी वारकरी शंकर गोळे, हनुमंत बेलोशे, सरपंच भाऊ यादव, श्रीहरी गोळे यांनी आषाढी एकादशीनिमित्त काही सूचना केल्या. त्याचा आदरपूर्वक विचार करून प्रशासनाने वारकऱ्यांनी मागणी केलेल्या मानाची संत ज्ञानेश्वर व दत्तात्रय महाराज कळंबे या पालख्यांसाठी परवानगी देऊन त्यासोबतच्या चार वारकऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. आढावा बैठकीस करहर पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाचे भाविक उपस्थित होते.
चौकट :
प्रतिपंढरपूर करहर येथील आषाढी एकादशचा सोहळा दि. २० जुलैरोजी होणार नसला तरी ‘पांडुरंगाचे दर्शन’ भक्तांना ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तरी दर्शनाचा लाभ भक्तांनी घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
१५करहर
करहर (ता. जावळी) येथील आषाढी एकादशीनिमित्त आढावा बैठकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वसंतराव मानकुमरे, प्रांताधिकारी राजेश टोम्पे आदी उपस्थित होते.