सातारा : जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ठ गावांमध्ये प्रशासकीय यंत्रणांबरोबरच लोकसहभाग, सामाजिक संस्थांनी सहभाग होऊन जूनअखेर प्राधान्यक्रमाने निवडलेली कामे पूर्ण करावीत, पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत बळकटीकरणास सर्वाधिक प्राधान्य द्यावे. जूनपर्यंत या कामाचा ‘रिझल्ट’ दिसलाच पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिल्या.सातारा पंचायत समितीच्या सभागृहात सातारा, जावली व कोरेगाव तालुकास्तरीय जलयुक्त संवाद आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, सभापती कविता चव्हाण, जावलीचे सभापती सुहास गिरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंंदे, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, तहसीलदार राजेश चव्हाण आदी उपस्थित होते.सुरुवातीला जावली, सातारा व कोरेगाव तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असणाऱ्या कामकाजाचा गावनिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित गावच्या ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी तसेच उपस्थित असणारे सरपंच, पाणलोट समित्यांचे सचिव यांच्याशी चर्चा करुन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांनी सूचना दिल्या. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘जलयुक्त अभियानात समाविष्ठ गावांचा जल आराखडा करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार हाती घेतलेली कामे व हाती घ्यावयाची कामे यासाठी करावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे सुरु करावीत. गावातील कामासाठी लोकसहभाग, संस्थांचा सहभाग किती याची माहिती देऊन कामे चांगल्या पद्धतीने होतील, यासाठी प्रयत्न करावेत. पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत समाविष्ठ गावांमध्ये प्राधान्यक्रमाची कामे होऊन पाणी अडविण्यात आले पाहिजे.’ पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत बळकटीकरणासाठी काय उपाययोजना करता येतील त्यासंबंधी उपस्थित ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक व सरपंचांशी चर्चा करुन उपाययोजना हाती घेण्याबाबत शासकीय यंत्रणांना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. जी. श्रीकांत म्हणाले, ‘गावामध्ये टँकर लागणार आहे का याची सविस्तर माहिती द्या. टँकर कायमचा बंद करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील त्याबाबतचीही माहिती द्या. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावातील टँकर बंद करायचा आहे. त्यासाठी लोकसहभाग, लोकप्रतिनिधींचा निधी यामधून कामे करा. बैठकीला सातारा, जावली व कोरेगाव या तालुक्यातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जूनअखेर परिणाम दिसला पाहिजे
By admin | Published: March 16, 2015 11:52 PM