सातारा : जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. संभाव्य टंचाई पाहता धरणांतील उपलब्ध पाणीसाठा प्राधान्याने पिण्याच्या पाणी आणि शेतीसाठी राखून ठेवावा. तसेच लंपी चर्मरोगामुळे छावण्याऐवजी चारा डेपोचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावेत, अशी सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, अनिल बाबर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव आदी उपस्थित होते. पालकमंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यातील गळती लागलेल्या उपसा सिंचन योजनाबाबत दक्षता घ्यावी. ही गळती काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाची लवकर बैठक घ्यावी. कालव्यामधून पाणी सोडले जाते ते शेवटच्या शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहचले पाहिजे. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे पुनर्नियोजन करावे. उरमोडी आणि कण्हेर धारणांमधील पाणी सातारा शहरासाठी राखीव ठेवावे. कालवे फोडणा-यांवर पाटबंधारे विभागाने गुन्हे दाखल करावेत.
टंचाईसाठी निधी कमी पडणार नाही...पाणीटंचाईला समोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. यासाठी शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही पालकमंत्री देसाई यांनी पाणीटंचाई आढावा बैठकीत दिली. टंचाई निर्माण होईल अशा तालुक्यातील जनावरांसाठी लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता छावण्याऐवजी चारा डेपोचे प्रस्ताव प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावेत. मोठ्या गावांमध्ये लोकसंख्येचा विचार करुन टँकरच्या खेपा वाढवाव्यात. विहिर दुरुस्ती, अधिग्रहण तसेच इतर उपाययोजनांचे प्रस्तावही जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावेत. तसेच आमदार यांच्याबरोबर तालुकास्तरीय टंचाई बैठक घ्यावी, असेही पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.