कऱ्हाड : नियमबाह्य बांधकाम परवाना दिल्याचा ठपका ठेवून रेठरे खुर्द ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा निर्णय पुणे आयुक्तांनी जानेवारी महिन्यात घेतला होता. मात्र, आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात सरपंच व पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्रालयाकडे दाद मागितली होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना दिलासा मिळेल, असे वाटत होते. मात्र, ग्रामविकास मंत्रालयाने हे प्रकरण फेरचौकशीसाठी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे पाठविले. मात्र, विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम यांनी पहिला निर्णय कायम ठेवल्याने रेठरे खुर्द ग्रामपंचायत बरखास्तीवर शिक्कामोर्फब झाले आहे.अतिक्रमण हटविण्याबाबत गेल्या पंचवीस वर्षांपासून रेठरे खुर्द येथे काही ग्रामस्थ पाठपुरावा करीत होते. तक्रारदार संतोष जाधव व इतरांनी यासाठी पाठपुरावा केला. गावातील दिनकर जाधव यांच्याकडूून सार्वजनिक जागेत भिंत बांधून अतिक्रमण करण्यात आले होते. याविरोधात १९९१ पासून या गावातील ग्रामस्थ अतिक्रमण हटविण्याबाबत लढा देत आहेत. याबाबत २००६ मध्ये ग्रामपंचायतीच्या बाजूने पहिला निकाल लागला. तरीही अतिक्रमण हटविण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली. याबाबत गटविकास अधिकारी कऱ्हाड यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यांनी परिस्थितीचा अभ्यास करून अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या ग्रामपंचायत बॉडीच्या विरोधात कारवाई करावी, असा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हा अहवाल तसाच पुढे पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठविला. आणि जानेवारी महिन्यात आयुक्तांनी सरपंच पुष्पा पाटील, उपसरपंच धनाजी जाधव यांच्यासह सर्व सदस्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय दिला.मात्र, हा निर्णय मान्य नसल्याने सरपंच पाटील यांनी ग्रामविकास मंंत्रालयाकडे अपील केले. हे अपील अंशतहा मान्य झाल्यानंतर हे प्रकरण पुन्हा पुन:सुनावणीसाठी पुणे आयुक्तांकडे पाठविण्यात आले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, पुणे आयुक्त याबाबत काय निर्णय घेणार याबाबत धाकधुक होतीच. याबाबत १६ मार्च रोजी आयुक्त चोकलिंगम यांनी पुन:चौकशी करून निकाल दिला असून, यामध्ये सरपंच, उपसरंपचासह सर्व सदस्यांना पदावरून काढून टाकण्यात येत आहे. हा निर्णय कायम ठेवल्याने सत्ताधाऱ्यांना चपराक बसली आहे. (प्रतिनिधी)कोणतीही लढाई बारकी किंवा मोठी नसते. रेठरेमधील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी आम्ही केलेली लढाई आमच्यासाठी खूप मोठी आहे. अनेकांनी राजकीय हस्तक्षेप करून देखील आमची बाजू सत्याचीच असल्यामुळे निकालावर आक्षेप घेतलेला असताना देखील आम्हाला न्याय मिळाला आहे. ही समाधानाची बाब आहे. सत्याचाच नेहमीच विजय होतो. हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.- अधिकराव पाटील,सामाजिक कार्यकर्ते, रेठरे खुर्दरेठरे खुर्दच्या ग्रामपंचायत बॉडी बरखास्त करण्याबाबतचे प्रकरण बरेच दिवस सुरू होते. आयुक्तांनी यापूर्वी ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सत्ताधारी गटाने मंत्री समितीकडे अपील केले होते. त्यानंतर आयुक्तांकडे पुन:सुनावणी झाली. या सुनावणीत एकूण सरपंच, उपसरपंचांसह अकरापैकी नऊ सदस्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.- अविनाश फडतरेगटविकास अधिकारी, पंचायत समिती कऱ्हाड
रेठरे खुर्द ग्रामपंचायत बरखास्तच!
By admin | Published: March 22, 2017 10:36 PM