फलटण : फलटण शहर पोलीस ठाण्यातून सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झालेल्या जीवन बोके यांनी निवृत्तीनंतर दीड वर्ष झाले तरी प्रशासनाने ग्रॅच्युइटी व पेन्शनची रक्कम दिलेली नाही. आर्थिक विवंचनेतून शुक्रवार, दि. १२ रोजी आत्मदहनाचा इशारा पोलीस प्रशासनाला दिला आहे.
जीवन बोके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, फलटण शहर पोलीस ठाण्यातून जीवन बोके हे ३० जून २०१९ रोजी सातारा पोलीस दलांतर्गत सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाले. मात्र, शिल्लक पेन्शन विक्रीचे व ग्रॅच्युइटी पैसे मिळालेले नाहीत. गेली आठ महिन्यांची तात्पुरती पेन्शन मिळाली नाही. यासंदर्भात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक यांना भेटले आहेत. तरीही कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. त्यांच्या पत्नीस गंभीर आजार असून दरमहा दहा हजार रुपयांचे औषधे सुरू आहेत. अखेरपर्यंत ही औषधे सुरू ठेवावयाची आहेत. तसेच जीवन बोके यांनाही वर्षापूर्वी पॅरॅलिसिसचा दौरा आलेला होता. त्यामधून ते बरे होत आहेत. हा खर्च पेन्शनमधून भागत नाही.
मी गेले वर्षभर वरील बाबींचा प्रयत्न, प्रत्यक्ष भेटीतून तसेच पत्रव्यवहारातून करत आहे; परंतु कोणत्याही स्तरावर कसलाच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे व मी कर्जबाजारी झाल्यामुळे माझ्यासमोर आत्मदहनाशिवाय पर्याय नाही.