कुडाळ: सेवानिवृत्ती हा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व क्षण. आपल्या अखंड सेवेत केलेल्या कार्याची प्रशंसा, आदरभावना आपल्या प्रियजनांकडून, सहकारी, अधिकारी यांच्याकडून व्यक्त होत असते. हा क्षण आणि यानिमित्ताने होणारा कार्यक्रमही प्रत्येकाच्या जीवनात नव्या इनिंगची सुरुवात करून देणारा ठरतो. तोही आज ऑनलाइनच होत आहे.
कोरोनाच्या संकटात गेली दीड वर्षांपासून सर्वच कार्यक्रमांना बंदी आहे. अशातच १ जून जन्मतारीख असणाऱ्या शासकीय किंवा खासगी क्षेत्रातील कोणत्याही कर्मचाऱ्यांची सेवा ही ३१ मे लाच पूर्ण होत असते. नियत वयोमानानुसार ही निवृत्ती. यामुळे सेवेच्या या निवृत्तीचा क्षण, सोहळाही प्रत्येकालाच आपलासा वाटणारा असतो. आज मात्र परिस्थिती काहीशी निराळीच आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटात या सेवपूर्तीचा सोहळाही घरूनच ऑनलाइन होत आहे. प्रत्यक्ष जरी एकत्र येत नसले तरी तंत्रज्ञानाच्या माध्यमाने का होईना हा आगळावेगळा कार्यक्रम मात्र निश्चितच अनुभवता येत आहे. यामुळे गेली वर्षे, दीड वर्षांपासून ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण सुरू आहे अगदी तसेच सेवानिवृत्तीचा शेवटचा क्षणही ऑनलाइनच.... साजरा होताना दिसत आहे.
(चौकट)
सोहळा अविस्मरणीयसाठी नियोजन...
प्रत्येकालच आपल्या सेवापूर्तीचा कार्यक्रम हवाहवासा वाटणारा असतो. आजपर्यंत केलेल्या कामाची शिदोरी घेऊन उर्वरित आयुष्यात एक नवीन ध्यासपर्वासाठी माणूस सज्ज होत असतो. सेवाकाळातील धडपड, कष्ट याची क्षणोक्षणी निश्चितच आठवण होत असते. घरप्रपंच सांभाळत सेवेसाठी दिलेला त्याग आणि प्रामाणिक सचोटीने केलेले कार्य या सर्वांचा सेवापूर्तीने गोड शेवट व्हावा, अशी प्रत्येकाची भावना असते. हा सोहळा अविस्मरणीय व्हावा, यासाठी योग्य नियोजनही होते.