फलटण : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रमुख विरोधकांनी माघार घेऊनही १६ जागांसाठी ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. आता दुरंगी लढत होत आहे. सत्ताधारी राजे गटाने तीन जागा बिनविरोध जिंकत विजयी सलामी दिली आहे. माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम गटाला राजे गटाने दोन जागा सोडल्या आहेत. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी १९६ अर्ज आले होते. तर कृषीप्रक्रिया मतदारसंघातून एकच मतदान होते. तसेच तेच उमेदवार असलेले माजी सभापती शिवरूपराजे खर्डेकर बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी राजेगटाबरोबर विरोधकांचेही मोठ्या प्रमाणात अर्ज राहिल्याने निवडणूक चुरशीची होईल, असे मानले जात होते. मागील निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी प्रमुख विरोधक माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, न्यू फलटण शुगर वर्क्स लि.चे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्यात मनोमिलन पॅटर्न राबवित काही जागा बिनविरोध करताना विरोधकांना पाच जागा दिल्या होत्या. यावेळेसही मनोमिलन पॅटर्नची चर्चा सुरू होती. मात्र, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी अर्ज मागे घेण्याच्या एकदिवस आधीच निवडणुकीत आपल्याला स्वारस्य नाही. साखर कारखान्याची उभारणी व सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष देण्यासाठी बाजार समिती लढविणार नाही. सर्व कार्यकर्त्यांनी अर्ज मागे घ्यावे, असे स्पष्ट केल्याने त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी अर्ज मागे घेतले होते. तालुक्यातील दुसरे विरोधक प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्याशी राजेगटाने चर्चा सुरू ठेवल्या होत्या. मात्र, त्यांनीही कार्यकर्त्यांशी चर्चा करून मनोमिलनाला नकार देतानाच निवडणुकीतून अंग काढून घेतले. त्यामुळे त्यांचे पुत्र धनंजय साळुंखे-पाटील व पाटील समर्थकांनीही माघार घेतल्याने आता १६ जागांसाठी ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिलेले आहेत. सत्ताधारी राजेगटाने सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. शिवरूपराजे खर्डेकर कृषी प्रक्रियातून बिनविरोध निवडून आले असले तरीसुद्धा त्यांनी सोसायटी मतदारसंघातून अर्ज कायम ठेवला आहे. व्यापारी मतदारसंघातून समर जाधव, संजय कदम बिनविरोध निवडून आले आहेत. राजेगटाने माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांच्यागटाला दोन जागा सोडल्या आहेत. कदम गटाचे सोसायटी मतदार संघातून बाळकृष्ण रणवरे व सोसायटी इतर मागासप्रवर्गातून प्रकाश भोंगळे हे दोन उमेदवार उभे आहेत. भाजपा मित्र पक्ष आघाडीनेही काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. प्रमुख विरोधक निवडणूक रिंगणात नसल्याने सत्ताधारी राजेगटाला आताची ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवार प्रचारात आहेत. (प्रतिनिधी)
प्रमुख विरोधकांची माघार तरीही दुरंगी लढत
By admin | Published: July 31, 2015 1:04 AM