पाटण : पाटण शहरात शनिवारी विनाकारण फिरणाऱ्यांना पाटणच्या प्रशासनाने एक नवी शक्कल लढवून चांगलाच दणका दिला.
विनाकारण फिरणाऱ्यांना अडवून त्यांची कोरोना रॅपिड चाचणी करण्यासाठी थेट ॲम्बुलन्समधून ग्रामीण रुग्णालयात रवानगी करण्यात आली, अशा नावीन्यपूर्ण मोहिमेमुळे विनाकारण फिरणाऱ्यांना चांगलाच धसका घेतला.
या मोहिमेमध्ये तहसीलदार योगेश्वर टोम्पे गटविकास अधिकारी मीना साळुंके, तालुका वैद्यकीय अधिकारी आर. बी. पाटील तसेच पाटण पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या गुरुवारपासून संपूर्ण राज्यात संचारबंदीची घोषणा केली. त्यानंतरही अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर येऊन गर्दी करू लागले. याला पाटणही अपवाद राहिलेले नाही. संचारबंदी असूनही पाटण शहरात आणि तालुक्याच्या इतर भागात चारचाकी, दुचाकीवाल्यांचे एकामागून एक लोंढे येत राहिले.
याबाबत नेमकी काय करावे, याचा अभ्यास तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच गटविकास अधिकारी आणि आरोग्य विभागातील डॉक्टरांनी एकत्र बसून एक वेगळाच निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम ही दिसून आला.
थेट ॲम्बुलन्स रस्त्यावर उभी करून विनाकारण ये-जा करणाऱ्यांना अडवून त्यांची कोरोना चाचणी करण्याची करण्यास सुरुवात केली. काही क्षणातच अनेकांची रस्त्यावरच कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी इतरत्र पसरली आणि विनाकारण फिरणारे काही तासातच रस्त्यावर दिसेनासे झाले.
पोलिसांच्या सहकार्याने राबवलेली ही मोहीम लवकरच जिल्ह्यासह इतरत्र त्याचे अनुकरण होईल, अशी अपेक्षा आहे.
चौकट..
सर्वच यंत्रणांनी समन्वय साधावा...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. संचारबंदीच्या काळात सर्वच यंत्रणांनी समन्वय साधून काम करण्याच्या सूचना तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांनी दिल्या आहेत. शुक्रवारी सकाळी बाजारात गर्दी झाल्याचे चित्र होते. यावेळी तहसीलदार, पंचायत समिती कर्मचारी आणि पोलीस उपस्थित होते.
विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या दिसून आल्याने तहसीलदारांनी विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड ॲन्टिजन चाचणी करण्याच्या सूचना दिल्या.